फुलं आवडत नाहीत अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. त्यात भारतीय महिला म्हटल्यावर त्यांच्या फुलांवरील प्रेमाचं वर्णनच करता येणार नाही. मात्र फुलांचा छानसा गजरा माळून ऑस्ट्रेलियात जाणं एका भारतीय अभिनेत्रीला चांगलंच महागात पडलं आहे. नियमभंग करत फुलांचा गजरा माळून आल्याने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विमानतळावर सीमाशुल्क विभागाने तिच्याकडून १९८० ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे १.१४ लाख रुपये) एवढा दंड वसूल केला आहे. नव्या नायर असं या अभिनेत्रीचं नाव असून, ती मल्याळम अभिनेत्री आहे.
मल्याळी समाजाने आयोजित केलेला ओणमचा सण साजरा केल्यानंतर तिने सांगितले की, येथे येण्यापूर्वी माझ्या वडिलांनी माझ्यासाठी चमेलीचं फुलं आणली होती. त्यांनी ती दोन भागांत कापून मला दिली. तसेच त्यांनी मला कोचीनपासून सिंगापूरपर्यंत डोक्यात फुलांची एक माळ लावण्यास सांगितले तर माळेचा उर्वरित भाग सिंगापूरपासून पुढील प्रवासात वापरता येईल म्हणून त्यांनी तो मला हँडबॅगमध्ये ठेवण्यास सांगितले.
नव्या नायरने पुढे सांगितले की, मात्र यादरम्यान ताज्या फुलांची माळा आणल्याने ऑस्ट्रेलियातील नियमांचा भंग झाला. ही चूक माझ्याकडून अनावधानाने झाली. मात्र याबाबबत मला कुठलााही बहाणा करायचा नाही आहे. १५ सेंटिमीटर लांब चमेलच्या 15 सेंटीमीटर हारांसाठी मला १९८० डॉलर ( सुमारे १.१४ लाख रुपये) दंड भरण्यास सांगण्यात आले. तसेच तो भरण्यासाठी मला आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियातील कायद्यानुसार जैव सुरक्षा अधिनियम (२०१५) नुसार येथे जैव सुरक्षा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे इथल्या जैव सुरक्षेला मारक ठरतील, अशा वस्तू आणि इतर पदार्थ ऑस्ट्रेलियात नेण्यास मनाई आहे. एक खंडीय देश असल्याने ऑस्ट्रेलियाकडून आपल्या या भूमिकेचं कायम समर्थन केलं जातं. वाढत्या जागतिक व्यापाराच्या पार्श्वभूमीवर बाहेरील देशातून येणाऱ्या संसर्ग जन्य कीटक आणि वस्तूंच्या प्रसाराबाबत संवेदनशील आहे.