मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेता फिश वेंकटचं (मंगलमपल्ली व्यंकटेश) वयाच्या ५३व्या वर्षी निधन झालं आहे. किडनी फेल झाल्यामुळे त्यांच्यावर अनेक दिवसांपासून हैदराबादमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. फिश वेंकट यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असून सर्वजण शोक व्यक्त करत आहेत
शेवटपर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही
वेंकट यांनी अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये त्यांच्या विनोदी अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. 'गब्बर सिंग', 'बन्नी', 'अधूर्स', 'डीजे टिल्लू', 'स्लम डॉग हजबंड' यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका विशेष लक्षात राहिली. फिश वेंकट यांना रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाने आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं.
त्यांची मुलगी श्रावंती हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचं आवाहन करताना सांगितलं होतं की, वडिलांच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी सुमारे ५० लाख रुपयांची गरज आहे. काही अभिनेते आणि चाहत्यांनी मदतीचा हात दिला, पण शेवटपर्यंत अपेक्षित निधी उभा राहिला नाही. सुपरस्टार प्रभासकडून ५० लाख मदत मिळाल्याची अफवा होती, पण त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती चुकीची असल्याचं स्पष्ट केलं. अभिनेता विश्वक सेन यांनी मात्र २ लाख रुपयांची मदत केली होती.
फिश वेंकट यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुवर्णा आणि मुलगी श्रावंती असा परिवार आहे. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे तेलुगू सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या विनोदी अभिनयाच्या आठवणी कायम रसिकांच्या मनात राहतील.