Join us

'आजाराच्या नावाखाली समंथा करतीये लोकांची दिशाभूल'; लिव्हर स्पेशालिस्ट डॉक्टरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 13:14 IST

Samantha: समंथाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये तिने चुकीची माहिती दिल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू  (samantha) गेल्या काही काळापासून तिच्या फिल्मी करिअरपेक्षा पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत येत आहे. २०१० मध्ये ये माया चेसावे या सिनेमातून दाक्षिणात्य कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या समंथाने १५ वर्षात बरीच प्रगती केली आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. सध्या समंथा मायोसायटीस या आजाराचा सामना करत असून याविषयी ती जनजागृती करताना दिसत आहे. मात्र, समंथा या आजाराच्या नावाखाली लोकांची फसवणूक करतीये, असा आरोप एका डॉक्टरांनी केला आहे.

अलिकडेच समंथाने ‘टेक २०’ या पॉडकास्टमध्ये एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आजाराविषयी आणि हेल्थविषयी भाष्य केलं. यावेळी तिने लोकांची जीवनशैली, यकृताचं कार्य, एकंदरीत शारीरिक आरोग्य याविषय़ी भाष्य केलं. यावेळी तिने आमंत्रित केलेला अलकेश नामक तरुणदेखील या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. मात्र, त्यांची ही मुलाखत ऐकल्यावर एका डॉक्टरांनी समंथा आजाराविषयी चुकीची माहिती देत असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

यकृताच्या आरोग्याविषयी बोलत असताना अलकेशने डेंडेलॉइन म्हणजे पिवळ्या रंगाच्या रानटी फुलांचं उदाहरण दिलं. काही वनौषधींच्या माध्यमातून यकृताचं आरोग्य सुधरता येतं. डेंडेलॉइन या फुलांच्या सेवनाने यकृत तंदरुस्त रहातं असं त्याने म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यावर डॉक्टर अॅबी फिलिप्स यांनी आक्षेप घेतला आहे. ते एक लिव्हर स्पेशालिस्ट आहेत. त्यांच्या त्यांच्या 'द लिवर डॉक' या एक्स हँडलच्या माध्यमातून या पॉडकास्टमध्ये चुकीची माहिती देण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.

काय आहे डॉक्टरांचं मत?

"ही समंथा रुथ प्रभू आहे जी एक फिल्मस्टार आहे. पण, समंथा लिवर डिटॉक्स विषयी चुकीची माहिती देऊन ३ कोटी फॉलोअर्सची दिशाभूल करत आहे. या पॉडकास्टमध्ये आरोग्यासंबंधी फारशी माहिती नसलेला वेलनेस कोच आणि परफॉर्मन्स न्युट्रिशनिस्टने सहभाग घेतलाय. ज्याला कदाचित मानवी शरीर नेमकं कशाप्रकारे काम करतं हे माहीत नाहीये. मला विश्वास बसत नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स असलेला स्टार विज्ञानाविषयी काहीही माहित नसलेल्या अशिक्षित लोकांना हेल्थ पॉडकास्टवर कसं काय बोलावू शकतो.  लोकांचा प्रत्यक्षात वैद्यकीय क्षेत्राशी, विज्ञानाशी काडीमात्र संबंध नसतो,” असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “या पॉडकास्टवर आलेला वेलनेस कोच याचा वैद्यकीय क्षेत्राशी दूरपर्यंत संबंध नाही. कदाचित त्याला यकृत नेमकं काय काम करतं हेदेखील धड माहीत नसावं. यकृत तंदुरुस्त राहण्यासाठी त्याने ‘डेंडेलॉइन’ हे सर्वात उत्तम असल्याचा दावा केला आहे. मी स्वतः लिवरचा डॉक्टर आहे अन् एक प्रशिक्षित रजिस्टर्ड हेपेटोलॉजिस्ट आहे जो गेल्या दशकापासून या क्षेत्रात कार्यरत आहे. यकृताच्या समस्या असणाऱ्या बऱ्याच रुग्णांवर मी उपचार केले आहेत. मी हे नक्कीच खात्रीने सांगू शकतो या पॉडकास्टमध्ये सांगितलेली गोष्ट ही बिनबुडाची अन् धादांत खोटी आहे.” 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywoodआरोग्यसेलिब्रिटीसिनेमा