'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो. याच शोने विनोदवीर प्रभाकर मोरेंना लोकप्रियता मिळवून दिली. अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत प्रभाकर मोरे प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. प्रभाकर मोरेंची शालूही त्यांच्याप्रमाणेच लोकप्रिय आहे. हास्यजत्रेच्या मंचावर त्यांनी अनेक कलाकारांना शालूवर ठेका धरायला भाग पाडलं. आता चक्क शिवसेनेचे आमदार प्रभाकर मोरेंच्या शालू गाण्यावर थिरकले आहेत.
उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सुवर्ण भास्कर नमन स्पर्धेचे आयोजन केलं होतं. या स्पर्धेला प्रभाकर मोरेंनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. यावेळी प्रभाकर मोरेंनी "अगं शालू झोका दे गो मायना" गाण्याची हुक स्टेप केली. त्यांच्यासोबत आमदार भास्कर जाधव यांनीही या गाण्यावर ठेका धरला. याच व्हिडिओ प्रभाकर मोरेंनी त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. यावर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. या व्हिडीओत भास्कर जाधवांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे.
दरम्यान, प्रभाकर मोरे सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. काही सिनेमांमध्येही ते झळकले आहेत. प्रभाकर मोरे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ते चाहत्यांना देतात.