गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranauat) यांच्यातील कायदेशीर लढाई अखेर संपली. आपसी सहमतीने त्यांच्यातील मतभेत दूर करत मुंबईतील न्यायालयाने वाद मिटवला. मात्र आता नुकतंच जावेद अख्तर यांची पत्नी शबाना आजमी (Shabana Azmi) यांनी एक खुलासा केला आहे. आपसी सहमतीने नाही तर कंगनाने माफी मागितल्यावर हे कायदेशीर प्रकरण मिटल्याचं त्या म्हणाल्या. याचा अर्थ दोघांमध्ये कोणतीही समेट झाली नव्हती.
काय म्हणाल्या शबाना आजमी?
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत शबाना आजमी म्हणाल्या, "जावेद अख्तर यांना कंगनाकडून आर्थिक किंवा मुद्रिक भरपाईची अपेक्षा नव्हतीच. तर त्यांना तिच्याकडून लिखित स्वरुपात माफीनामा हवा होता. त्यामुळे जावेद अख्तर यांचे वकील ही केस जिंकले आहेत. कंगना आणि त्यांच्यात समेट झाल्याची बातमी पसरली ती चूक आहे. जावेद अख्तर यांना कंगनाकडून माफी हवी होती म्हणून त्यांनी चार वर्ष कायदेशीर लढाई लढली असा खुलासा शबाना आजमी यांनी केला.
कंगनाने बिनशर्त माफी मागितली
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कंगना राणौतने जावेद अख्तर यांच्यासोबत समेट झाल्याची पोस्ट केली होती. ती म्हणाली, "१९ जुलैला दिलेल्या एका मुलाखतीत आणि त्यानंतर जावेद अख्तर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे काही गैरसमज झाले. मी माझे सर्व वक्तव्य मागे घेते आणि भविष्यातही असं करणार नाही याचं वचन देते. जावेद अख्तर यांना झालेल्या गैरसोयीसाठी मी माफी मागते. ते इंडस्ट्रीतील दिग्गज आहेत आणि मी त्यांचा सम्मान करते."
यानंतर जावेद अख्तर यांनीही तक्रार मागे घेतली. नंतर दोघांनी एकत्रित फोटोही काढला. जावेद अख्तर यांनी कंगनाच्या सिनेमात गाणं लिहिण्याचीही तयारी दर्शवली.