"अपनी हद में रहना सीख लो. वरना ना तो ये सरहद रहेगी और ना ही तुम...", असं पाक सैन्याला ठणकावून सांगणाऱ्या भारतीय सैन्याच्या शौर्याची कहाणी म्हणजे 'बॉर्डर-२' सिनेमा. आज २३ जानेवारीला हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. उत्तम अभिनय, उत्कृष्ट संवाद, सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टीचा लाजवाब अभिनय आणि भारतीय सैन्याचा गौरवशाली इतिहास सिनेमात दिसतोय. का पाहावा 'बॉर्डर-२'? रिव्ह्यू वाचा.
कथानक : कथानकाची सुरुवात भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या चकमकीपासून होते. मात्र, मेजर फतेह सिंह कलेर अर्थात सनी देओल त्यांचा हा डाव हाणून पाडतो. यातूनच भारतीय सैन्य दलाच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडते. सिनेमात १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. त्यानंतर नॅशनल ट्रेनिंग अकॅडमीमधील मेजर होशियार सिंह दहिया, फ्लाइट कमांडर निर्मल जीत सिंह आणि लेफ्टिनेंट कमांडर एम.ए.रावत यांच्या मैत्रीची सुरेख कहाणी गुंफण्यात आली आहे. या तिघांमधील मैत्री आणि त्यात पेरलेला हलका-फुलका विनोद कधी डोळ्यांत अश्रू आणतो तर कधी ओठांवर हसू. 'बॉर्डर-२' भारतीय सैन्यातील तिन्ही दलांच्या शौर्याचे चित्रण करतो. सिनेमातील संवाद आणि काही सीन हे निश्चितच अंगावर काटा आणणारे आहेत. मध्यतरापर्यंत कथानक हळूहळू पुढे जाते पण त्यानंतर सिनेमा पूर्णपणे भारत-पाक युद्धाच्या परिस्थितीवर भाष्य करतो.
लेखन- दिग्दर्शन
अनुराग सिंग यांनी 'बॉर्डर-२' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. एवढा मोठ्या आणि खूप वेगाने घडणाऱ्या घटना दाखवताना दिग्दर्शकाची दमछाक झाली आहे. मात्र, असं असूनही 'बॉर्डर-२' बऱ्याच पातळ्यांवर वेगळा आणि उजवा ठरतो. चित्रपटाचा विषय आणि मांडणी दर्जेदार आहे. शिवाय जुनी गाणी वापरण्याची कल्पनाही झकासच म्हणता येईल.
अभिनय: 'बॉर्डर २' हा सिनेमा सनी देओलने आपल्या खांद्यावर पेलला आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टीने सुद्धा तोडीस तोड काम केलं आहे. पडद्यावर या तिघांनी त्यांच्या व्यक्तिरेखा अक्षरश: जिवंत केल्याने ते प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरे उतरले आहेत. सीम्मी सिंहच्या भूमिकेत असलेल्या मोना सिंगनेही भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. शिवाय सोनम बाजवा, मेधा राणा, अन्या सिंग यांनी देखील उत्तमच काम केलेलं आहे.
सकारात्मक बाजू : संगीत, दमदार कथा, कलाकारांचा अभिनय
नकारात्मक बाजू : सिनेमाचं कथानक मोठे असल्यामुळे काही घटनांचे संदर्भ पटकन लागत नाहीत.
थोडक्यात काय तर, तुम्ही सनी देओलचे चाहते असाल, तर हा चित्रपट आवर्जून बघा. तुमचं नक्की मनोरंजन होईल. याशिवाय तुमच्या मनात देशभक्तीचं स्फुरण चढेल यात शंका नाही.