६१ व्या राज्य शासनाच्या पुरस्कार सोहळ्यात 'आशा' सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. तर रिंकू राजगुरुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान प्राप्त झाला. आशा स्वयंसेविकांची आजवर कधीच न पाहिलेली कहाणी या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीला आली आहे. दिपक पाटील दिग्दर्शित 'आशा' सिनेमा कसा आहे?
कथानक:
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका असलेल्या मालतीची ओळख सिनेमाच्या सुरुवातीला होते. गरोदरपणात महिलांवर उपचार नीट होत आहेत का, याची खबरदारी घेणं, त्यांना मासिक पाळीबद्दल जागरुक करणं अशी महत्वाची कामं मालती आणि आशा वर्कर करताना दिसतात. सुनेने बाहेर काम न करता घरीच लक्ष द्यावं, असं मालतीच्या सासूचं म्हणणं असतं.
परंतु मालती समाजाकडून होणारा विरोध झुगारुन आशा वर्कर म्हणून गावातील घराघरात फिरते. एकदा गावात काम करताना मालतीचं लक्ष एका गरोदर महिलेकडे जातं. त्या महिलेविषयी सखोल माहिती जाणून घेतल्यावर मालतीच्या समोर एक जळजळीत वास्तव उभं राहतं. पुढे मालती त्या महिलेला कशी मदत करते? याची कहाणी 'आशा' सिनेमात दिसते.
लेखन-दिग्दर्शन:
अंतरिक्ष श्रीवास्तव यांनी सिनेमाच्या लेखनाची जबाबदारी सांभाळली आहे. हा सिनेमा कुठेही माहितीपट न होता तो रंजक कसा होईल, याचा त्यांनी विचार केलेला आहे. त्यामुळेच आशा वर्करचं काम सर्वांपर्यंत पोहोचतंच शिवाय सिनेमा मनोरंजनही करतो. 'आशा'चा विषय गंभीर असला तरीही आवश्यक तिथे विनोदाची पेरणी केल्याने कथानक हलकंफुलकं होण्यास मदत झाली आहे. दिपक पाटील यांनी 'आशा'चं प्रभावी दिग्दर्शन केलं आहे. विषयाचा अभ्यास आणि त्याची समर्पक मांडणी त्यांच्या दिग्दर्शनात बघायला मिळते.
अभिनय:
रिंकू राजगुरुने आशा स्वयंसेविका असलेल्या मालतीची भूमिका उत्कृष्ट वठवली आहे. मालती बिनधास्त आणि कोणाला न घाबरणारी असली तरीही तिच्यात असलेली संवेदनशीलता रिंकूने उत्कृष्ट दाखवली आहे. काही ठिकाणी संवाद नसताना मालतीची घुसमट रिंकूने डोळ्यांतून व्यक्त केली आहे. 'आशा'मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना पाहणं हा एक सुखद अनुभव आहे. विनोदाचा अफलातून टायमिंग उषाताईंच्या अभिनयात दिसतो. साईंकित कामत, शुभांगी भुजबळ, भाग्यश्री देसले, सुहास शिरसाट यांच्याही भूमिका लक्षात राहतात.
सकारात्मक बाजू: महत्वाचा विषय, कलाकारांचा अभिनय, संगीतनकारात्मक बाजू: मध्यंतराआधीची संथ गती
थोडक्यात काय तर, सामाजिक विषय मांडताना नर्मविनोदी शैलीत प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे अवघड काम आहे. परंतु दिग्दर्शक दिपक पाटील आणि 'आशा'च्या संपूर्ण टीमने हे शिवधनुष्य लीलया पेललं आहे. गरोदरपणात स्वतःकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिलांच्या मनात हा सिनेमा पाहून नक्कीच जागरुकता निर्माण होईल. त्यामुळे सहकुटुंब 'आशा' नक्की बघा.