राखी सावंतची मैत्रीण म्हणून प्रसिद्धीझोतात आलेली राजश्री मोरे (Rajashree More) चर्चेत आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्तीविरोधात अनेकांनी आवाज उठवला असताना राजश्रीने परप्रांतियांची बाजू घेतली होती. यानंतर काल रविवारी रात्री राजश्रीचा अपघात झाला. तिच्या गाडीला एका मनसे नेत्याच्या मुलाने धडक दिली. तो मुलगा अर्धनग्न अवस्थेत होता आणि तिला शिवीगाळही करायला लागला. याचा व्हिडिओ आता तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
राजश्री मोरेने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहील शेख अर्धनग्न अवस्थेत कारमध्ये आहे. राजश्री त्याला जाब विचारत आहे. 'माझी गाडी ठोकलीस, असा उघडा तू कुठे चालला होता? मनसेवाले, तुम्ही लोक मराठी शिकवता ना? तू दारु पिऊन माझ्या गाडीवर चढणार, मला शिव्या देणार? मी थोडंसं परप्रांतीय लोकांना साथ दिली तर काल २०० लोक माझ्या अंगावर आले. आज तू माझी गाडी ठोकली. मला बापाचं नाव सांगून धमकी देतो." यानंतर राजश्रीने पोलिसांना बोलवलं. तरी तो तिला शिव्या देत होता.
राजश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, "राहील जावेद शेख..मनसे पक्ष.. हा मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता. सरळ येऊन माझी गाडी ठोकली. मुंबईचे मनसेवाले माझ्या मागे लागले आहेत. मी याच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे."
जावेद शेख हे मनसे राज्य उपाध्यक्ष आहेत. तर राहील हा त्यांचा मुलगा आहे. राजश्री मोरेने काही दिवसांपूर्वी व्हिडिओ शेअर करत म्हणाली होती की मराठी भाषेचा आदर असावा पण माज नाही. आपली भाषा इतरांवर थोपण्याची गरज नाही असं वक्तव्य तिने केलं होतं. राजश्रीचा स्वत:चा नेल आर्ट स्टुडिओ आहे. ती हेअर स्टायलिस्ट आहे.