नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayana) सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. सिनेमाची तगडी स्टारकास्ट, आंतरराष्ट्रीय व्हीएफएक्स टीम, पटकथा या सगळ्याच बाबतीत रिलीज आधीच सिनेमासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ निर्माण झाली आहे. उद्या ३ जुलै रोजी सिनेमाची पहिली झलक समोर येणार आहे. यासाठी सगळेच उत्सुक आहे. दरम्यान फिल्म समीक्षक तरण आदर्श यांनी पहिली झलक पाहिली असून त्यावर रिव्ह्यू दिला आहे.
कसा असणार आहे 'रामायण' सिनेमा?
रणबीर कपूर, साई पल्लवी अभिनीत बहुप्रतिक्षित 'रामायण' सिनेमाची पहिली झलक उद्या समोर येणार आहे. त्याआधी काही फिल्म समीक्षकांना झलक दाखवण्यात आली आहे. त्यावर त्यांनी रिव्ह्यू दिला आहे. तरण आदर्श यांनी ट्विटरवर लिहिले, "जय श्रीराम...आताच रामायण सिनेमाची झलक पाहिली. 'रामायण' या महाकाव्यावर आधारित बहुप्रतिक्षित अशा या सिनेमाचा ७ मिनिटांचा शो रील पाहिला. या गाथेची पहिली झलक थक्क करणारी आहे.'रामायण' फक्त आज नाही तर येणाऱ्या प्रत्येक पिढीवर प्रभाव पाडणारा सिनेमा ठरेल असं मी ठामपणे सांगू शकतो. बॉक्सऑफिसवर वादळ येणार आहे. या महत्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी घेतल्याबद्दल दूरदृष्टी असलेले निर्माते नमित मल्होत्रा यांचं कौतुक."
तरण आदर्श यांच्या या रिव्ह्यूनंतर आता प्रेक्षकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमाचं बजेट तब्बल ८३५ कोटी आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, सनी देओल, यश, रवी दुबे, लारा दत्ता, रकुल प्रीत, अरुण गोविलसह अनेक कलाकार यामध्ये भूमिका साकारत आहे. पुढील वर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर 'रामायण'चा पहिला भाग रिलीज होणार आहे. तर २०२७ साली दिवाळीच्याच मुहुर्तावर याचा दुसरा भाग येणार आहे. उद्या 'रामायण'ची पहिली झलकसोबतच रिलीज डेटची घोषणा होण्याचीही शक्यता आहे.