Preity Zinta: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रीती झिंटा (Preity Zinta). प्रितीने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी अशी ओळख बनवली आहे. प्रिती आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिचा दांडगा वावर आहे. रोखठोक मत मांडण्यासाठी ती ओळखली जाते. आताही तिनं असंच एक ट्विट शेअर केलं आहे. प्रीतीनं सोशल मीडियावरील वाढती नकारात्मकता आणि ट्रोलिंगवर (Preity Zinta Expresses Frustration Over Online Trolling) स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तिच्या या ट्विटची सध्या चर्चा रंगली आहे.
प्रीतीने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली आहे. तिनं लिहलं, "सोशल मीडियावर लोकांचं काय चाललं आहे? प्रत्येकजण हा एक टीकाकार बनला आहे. जर कोणी पहिल्यांदा एआय बॉटसह त्यांच्या पहिल्या चॅटबद्दल सांगितलं, तर ती एक जाहिरात आहे असं लोक मानतात. जर तुम्ही पंतप्रधानांचं कौतुक केलं तर ते तुम्हाला भक्त समजतात आणि जेव्हा तुम्ही हिंदू धर्माचा किंवा भारतीय असल्याचा अभिमान असल्याचं म्हणता, तेव्हा तुम्हाला अंधभक्त म्हटलं जातं".
"चला तर जे खरं आहे ते ठेवूया आणि लोकांना ते जसे आहेत तसंच समजूया... लोकांना ते कोण आहेत आणि ते कसे असावेत हे आपण ठरवू नये. आपण सर्वांनी शांत राहायला हवं. एकमेकांशी संवाद साधला तर आपल्या सर्वांना आनंद होईल. आता मला विचारू नका की मी जीनशी लग्न का केलं? मी त्याच्याशी लग्न केलं कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. कारण सीमेपलेकडे अशी एक व्यक्ती आहे, जी माझ्यासाठी आपला जीवदेखील देऊ शकते, समजलं", या शब्दात तिनं आपलं मत मांडलं.
प्रिती झिंटाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने २०१६ मध्ये जीन गुडइनफशी लग्न केले. जीन आणि प्रीती यांनी एकमेकांना पाच वर्षे डेट केले आणि त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनेत्रीने सरोगेसीच्या मदतीने जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यांचं नाव जय आणि जिया असं आहे. तर प्रीती ही पंजाब किंग्जची मालकीण आहे. याशिवाय लवकरच ती सनी देओलसोबत 'लाहोर १९४७' मध्ये दिसणार आहे.