बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, हा गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांचा एन्काऊंटर करण्यात आला असून, गाझियाबाद येथे झालेल्या चकमकीत उत्तर प्रदेश एसटीएफ, हरियाणा आणि दिल्ली क्राईम ब्रँचच्या संयुक्त पथकाने या हल्लेखोरांना ठार मारले.
या चकमकीबाबत अधिक माहिती देताना उत्तर प्रदेश एसटीएफचे एएसपी राजकुमार मिश्रा यांनी सांगितले की, ही संपूर्ण कारवाई टीम वर्क आणि सखोल गुप्तचर माहितीच्या आधारावर करण्यात आळी. दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे पोलीस आरोपींच्या मागावर होते. तसेच त्यांची सातत्याने ट्रॅकिंग केली जात होती. सीसीटीव्ही फुटेज, इंटेलिजन्स इनपूट आणि त्यांच्या जुन्या रेकॉर्डची सखोल तपासणी करण्यात आली. यादरम्यान, हल्लेखोर हरियाणामधील सोनीपत आणि रोहतक येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिश्रा यांनी पुढे सांगितले की, रोहतक येथील रवींद्र उर्फ कल्लू आणि सोनीपत येथील अरुण हे बरेलीजवळ पोहोचणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी सापळा लावून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरदाखल केलेल्या गोळीबारात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, या चकमकीमध्ये पोलिसांचे चार जवानही जखणी झाले आहेत. चकमकीत ठार झालेले दोन्ही आरोपी हे रोहित गोल्डी ब्रार गँगचे सक्रिय सदस्य होते. तसेच त्यांच्यावल अनेक गुन्हेही दाखल होते. पोलिसांना घटनास्थळावरून एक ग्लॉक पिस्तूल, एक जिगाना पिस्तूल, काही जिवंत काडतुसं आणि एक पांढऱ्या रंगाची अॅपाचे दुचाकी सापडली आहे.