Join us

सगळे 'मामा' म्हणतात तेव्हा काय वाटतं? अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:09 IST

1 / 10
पद्मश्री-महाराष्ट्रभूषण अशोक सराफ (Ashok Saraf ) यांनी गेली अनेक दशकं रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. अशोक सराफ यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाने अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत.
2 / 10
अशोक सराफ यांना सर्वांकडून भरभरून प्रेम मिळतं. त्यांना सर्वजण प्रेमाने 'मामा' अशी हाक मारतात. त्यांना 'मामा' म्हणण्याची सुरुवात कशी झाली हे खुद्द अशोक सराफ यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये उघड केलं.
3 / 10
याशिवाय सगळे 'मामा' म्हणतात तेव्हा काय वाटतं? याबद्दलही अशोक सराफ यांनी (Ashok Saraf On Being Called Mama) आपल्या भावना व्यक्त केल्या.
4 / 10
अशोक सराफ यांनी नुकत्याच 'अमुक तमुक'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना 'मामा' अशी पहिल्यांदा हाक कुणी मारली, याबद्दल खुलासा केला आहे.
5 / 10
अशोक सराफ यांनी सांगितलं की, कोल्हापुरात शुटिंग सुरू होतं, तेव्हा सेटवरील लोकांना त्यांना नेमकी काय हाक मारावी असा प्रश्न होता. ते अशोक साहेब म्हणायचे नाहीत. अशोक म्हणू शकत नव्हते.
6 / 10
अशोक सराफ पुढे सांगितलं, 'एकेदिवशी त्या शूटिंग सेटवर प्रकाश शिंदे म्हणून एक कॅमेरामॅन त्याच्या छोट्या मुलीला घेऊन आला. माझी ओळख करुन देताना तो तिला म्हणाला 'हे कोण माहितेय, हे तुझे अशोक मामा'. त्यानंतर तोच मला हळुहळु अशोक 'मामा' म्हणायला लागला. बाकीचे सेटवरचे जे वर्कर्स होते, त्यांचा मला हाक मारण्याचा प्रश्न सुटला. मग तेही मला 'मामा' म्हणायला लागले'
7 / 10
अशोक सराफ म्हणाले, 'ते आता एवढं झालं की शुटिंग करताना रस्त्यावर जी लोक जमा होतात, त्यातून एखादा 'ओह मामा' म्हणून हाक मारतो'.
8 / 10
सर्व जण 'मामा' म्हणतात तेव्हा काय वाटतं, याबद्दल उत्तर देताना अशोक सराफ भावुक झाले. ते म्हणाले, 'ठीक आहे, 'मामा' म्हणतात ते बरं आहे. एखाद्याचा 'मामा' होणे म्हणजे मोठी गोष्ट. 'मामा' म्हणून तुम्ही मला तुमच्या आईचा भाऊ बनवता. मला थेट घरात नेऊन ठेवलंय, यापेक्षा आणखी काय पाहिजे', या शब्दात अशोक सराफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
9 / 10
अशोक सराफ यांच्या या प्रतिक्रियेतून त्यांची नम्रता आणि प्रेक्षकांप्रती असलेल्या ऋणभावना दिसून आली. 'मामा'ही केवळ एक हाक नाही, तर ती एक कलाकार आणि त्याच्या चाहत्यांमधील भावनिक बंध आहे.
10 / 10
दरम्यान, अशोक सराफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
टॅग्स :अशोक सराफमराठी अभिनेतामराठी चित्रपटमहाराष्ट्र