Join us

घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:25 IST

काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये काम करणारा आणि सध्या पाकिस्तानात असलेल्या अभिनेत्याच्या घराजवळ बाँब हल्ला झाल्याने तो चांगलाच बिथरला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून भावना व्यक्त केल्या

भारतात पहलगाम हल्ला झाला आणि निष्पाप लोकांचा बळी गेला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बुधवारी मध्यरात्री 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. यामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांची ९ तळी उद्धवस्त झाली. या हल्ल्यामुळे पाकिस्तानी कलाकारांचा मात्र चांगलाच तीळपापड देला. अनेक कलाकारांनी भारताला दोष दिला. बॉलिवूड सिनेमांमध्ये कोणे एके काळी काम करणारा आणि सध्या पाकिस्तानात राहणारा अभिनेता-गायक अली जफरच्या (ali zafar) घराजवळ बाँब हल्ला झाल्याने तो चांगलाच बिथरला आहे. अलीने सोशल मीडियावर त्याविषयी पोस्ट लिहिलीय. 

अली जफर काय म्हणाला?

अली जफरने सोशल मीडियावर लिहिलंय की, "मी आताच माझ्या घरात राहून बाँब हल्ल्याचा आवाज ऐकला. जे लोक युद्धाचा ढोल वाजवत आहेत आणि हिंसेचा आनंद साजरा करत आहेत, त्यांना दोन परमाणु देशात होणाऱ्या संभाव्य युद्धाचा अर्थ तरी समजतो का? हा कोणता सिनेमा नाहीय. युद्ध एक प्रकारचं नुकसान आहे.  निष्पाप आयुष्य, लहान मुलं आणि अनेक कुटुंबांना याची किंमत चुकवावी लागते. जगाला जागण्याची वेळ आली असून आम्हाला शांतता हवी आहे. दिखावा दाखवण्याची काही गरज नाही."

"प्रत्येकाच्या आयुष्याला महत्व आहे. आमचा देशालाही सुरक्षेचा पूर्ण हक्क आहे. हा वेडेपणा थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने निर्णायकपणे हस्तक्षेप केला पाहिजे. संवाद हाच एकमेव उपाय आहे. बोला, ऐका आणि प्रश्न सोडवा. या प्रदेशातील आणि जगभरातील अब्जावधी लोकांचे जीवन यावर अवलंबून आहे." अशाप्रकारे अलीने त्याचा राग आणि चीड व्यक्त केली आहे. 

 

टॅग्स :बॉलिवूडऑपरेशन सिंदूरपहलगाम दहशतवादी हल्लाभारतपाकिस्तान