Join us

Ved Movie Screening: रितेश, जेनेलियाचं कौतुक केलंच, पण अशोकमामांना 'होम मिनिस्टर'कडून खास 'कॉम्पलिमेंट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 13:48 IST

Ved Movie, Nivedita  Saraf : चित्रपट नक्कीच हिट होणार...! अशोक सराफ यांच्या पत्नी व अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी ‘वेड’च्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) ‘वेड’ (Ved) हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. रितेश अन् जिनिलियाच्या या सिनेमानं सर्वांनाच वेड लावलं आहे. सलमान खान या सिनेमाचं आकर्षण आहे. सोबतचे आपले लाडके मामा अर्थात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हेही एक आकर्षण आहेत. सगळ्यांना अशोक मामांना पाहण्याची उत्सुकता लागली आहे. अशात अशोक सराफ (Ashok Saraf ) यांच्या पत्नी व अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita  Saraf ) यांनी ‘वेड’च्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

‘वेड’च्या स्पेशल स्क्रिनिंगला निवेदिता यांनी हजेरी लावली होती. या स्क्रिनिंगचा रितेश, जिनिलिया व अशोक सराफ यांच्यासोबतचा एक फोटो निवेदिता यांनी शेअर केला आहे.  या पोस्टमध्ये निवेदिता यांनी रितेश व जिनिलियाचं जबरदस्त कौतुक केलं आहे. शिवाय अशोक सराफ यांनाही एक मस्तपैकी कॉम्पलिमेंट दिलं आहे.

‘वेड चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यानचा फोटो. दिग्दर्शक म्हणून  रितेश देशमुखचा हा पहिलाच चित्रपट आहे, असं वाटत नाही. जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तिने खूप छान काम केलं आहे, असं निवेदिता यांनी म्हटलं आहे.पुढे काय तर निवेदिता यांनी अशोक सराफ यांचं कौतुक केलं आहे. ‘आपल्या अफलातून अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची क्षमता आजही अशोक सराफ यांच्यात आहे. हा चित्रपट नक्कीच हिट होणार,’ असं त्यांनी म्हटलं आहे. होममिनिस्टरकडून झालेल्या या कौतुकाने अशोक सराफही भारावून गेले असणार, हे नक्कीच.

‘वेड’ सिनेमाबद्दल सांगायचं तर उद्या 30 डिसेंबरला हा सिनेमा  सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा रितेशने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुख दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत आहे. जिनिलिया पहिल्यांदाच मराठी सिनेमात झळकणार आहे. चित्रपटात जिनिलीया व रितेशच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. शिवाय सलमान खानचा कॅमिओ आहे. सलमान व रितेशवर चित्रीत ‘वेड लावलंय’ या गाण्यानं सध्या धुमाकूळ घातला आहे.

टॅग्स :निवेदिता सराफअशोक सराफरितेश देशमुखवेड चित्रपटमराठी चित्रपट