गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) नुकतीच चर्चेत आली होती. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील कॉन्सर्टसाठी ती ३ तास उशिरा आली. नंतर स्टेजवर येत तिने रसिकांची माफी मागितली आणि ढसाढसा रडली. यामुळे ती प्रचंड ट्रोलही झाली होती. नंतर नेहाने उशिरा येण्याचं कारण सांगितलं. कॉन्सर्टचे आयोजकच पैसे घेऊन पळाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला असं ती म्हणाली. मात्र आता आयोजकांनी सोशल मीडियावर सर्व पुरावे दाखवत नेहा खोटं बोलत असल्याचं सांगितलं आहे.
नेहा कक्करने मेलबर्न कॉन्सर्टला उशिरा येण्याचा सर्व दोष आयोजकांना दिला. आयोजक पैसे घेऊन पळाले, तिच्या बँडला ना हॉटेल मिळालं ना जेवायला अन्न दिलं. त्यांचे खूप हाल झाले असं तिने स्पष्टीकरण दिलं. आता कॉन्सर्टचे आयोजक बीट्स प्रोडक्शन यांनी सोशल मीडियावर स्क्रीनशॉट आणि व्हिडिओही शेअर केलेत. यात त्यांनी मेलबर्न आणि सिडनी कॉन्सर्टचे सर्व बिल्स दाखवले आहेत. तसंच नेहाच्या कॉन्सर्टमुळे त्यांना ४.५२ कोटींचं नुकसान झाल्याचंही दाखवलं आहे. तसंच सिडनी, मेलबर्न आणि पर्थ क्राऊन टॉवर्सने तिच्यावर बॅन लावल्याचा दावाही कंपनीने केला आहे. इतकंच नाही तर नेहा आणि तिच्या सहकाऱ्यांनी हॉटेलमध्ये नो स्मोकिंग एरियाही धूम्रपान केलं याचाही पुरावा त्यांनी दाखवला आहे.
याशिवाय प्रोडक्शन कंपनीने व्हिडिओ शेअर करत नेहा कक्कर आणि तिच्या टीमसाठी ट्रान्सपोर्टचीही व्यवस्था केली होती हे दाखवलं आहे. यामध्ये नेहा तिच्या चाहत्यांना भेटताना दिसते. तसंच बाहेर तिच्यासाठी गाड्यांचा ताफा दिसत आहे.
नेहा कक्करने अद्याप आयोजकांच्या या पुराव्यानंतर काहीही उत्तर दिलेलं नाही. दरम्यान नेहाच नाही तर तिचा पती रोहमनप्रित सिंगही या टूरमध्ये तिच्यासोबत होता. त्यानेही नेहाची बाजू घेत घडलेलं सर्व सांगितलं होतं.