Aashutosh Gokhale: 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही मालिका स्टार प्रवाहवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. जवळपास ४ वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात 'रंग माझा वेगळा' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु त्यातील कलाकार कायमच चर्चेत येत असतात. हे कलाकार सध्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करताना दिसत आहेत. 'रंग माझा वेगळा' मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतलं. यातील कार्तिक-दीपाची जोडीने त्यांच्या मनावर गारुड घातलं होतं. अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) मालिकेत दीपा नावाचं पात्र साकारलं तर आशुतोष गोखले (Aashutosh Gokhale) कार्तिक इमानदारच्या भूमिकेत झळकला. दरम्यान, नुकतीच आशुतोष गोखलेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
आशुतोष गोखलेने इन्स्टाग्रामवर अकाउंटवर रेश्मा शिंदेसोबत खास फोटो शेअर केल्याचा पाहायला मिळतोय. या फोटोसोबत कॅप्शन देत अभिनेत्याने लिहिलंय, "दीपाची जानकी झाली. कार्तिक नव्याने पूर्ण Villain झाला..., पण chemistry अजूनही तशीच. कुछ चीज़ें कभी नहीं बदलती...!" अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे. आशुतोषच्या या पोस्टवर अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्यासह आणखी मराठी कलाकारांनी लाईक्स आणि कमेंट्स करत त्याचं कौतुक केलं आहे.
'रंग माझा वेगळा' गाजवल्यानंतर आशुतोष गोखले सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील तू ही रे माझा मितवा मालिकेत काम करताना दिसतो आहे. या मालिकेत अभिनेता खलनायिकी भूमिकेत पाहायला मिळतोय.