Bal Karve Death: मराठी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालंय. त्यांनी दूरदर्शनवरील 'चिमणराव आणि गुंड्याभाऊ' मालिकेत साकारलेली 'गुंड्याभाऊ'ची भूमिका चांगलीच गाजली. या मालिकेत दिलीप प्रभावळकर आणि बाळ कर्वे यांची जोडी प्रेक्षकांना आवडली. तीन दिवसांपूर्वीच बाळ कर्वे यांनी त्यांचा ९५ वा वाढदिवस साजरा केला होता. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आणि चाहत्यांनी बाळ कर्वे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बाळ कर्वे यांची कारकीर्द
बाळ कर्वे यांनी टीव्ही मालिका आणि रंगभूमीवरील दर्जेदार कलाकृतींमघ्ये काम केलं. ‘सूर्याची पिल्ले’, ‘रथचक्र’, ‘तांदुळ निवडता निवडता’, ‘मनोमनी’, ‘कुसुम मनोहर लेले’ अशा नाटकांमध्ये बाळ कर्वे यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. 'प्रपंच', 'राधा ही बावरी', 'वहिनीसाहेब', 'उंच माझा झोका' या मालिकांमध्ये बाळ कर्वेंनी काम केलं होतं. ‘जैत रे जैत’ हा बाळ कर्वेंनी अभिनय केलेला पहिला चित्रपट. या सिनेमासोबतच ‘सुंदरा सातारकर’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, ‘चटक चांदणी’, ‘बन्याबापू’ अशा सिनेमांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका विशेष गाजल्या.
एकमेव हिंदी सिनेमात केलं काम
सई परांजपे यांच्या 'कथा' या एकमेव सिनेमात त्यांनी अभिनय केले होते. हिंदीत त्यांनी आणखी काही काम केलं नाही. मराठी मनोरंजन विश्वातील 'प्रीतीचं झुळझुळ पाणी' हे गाजलेलं गाणं बाळ कर्वे यांच्यावर चित्रित झालं आहे. उत्कृष्ट अभिनय, मराठी भाषेवर प्रभुत्व, नम्र स्वभाव, अभिनयाची समज आणि सहकलाकारांसोबतची मैत्री अशा गुणांमुळे बाळ कर्वे ओळखले जात असत. बाळ कर्वे यांच्या निधनामुळे अनेक मान्यवरांनी शोक केला असून हळहळ व्यक्त केली आहे.