Join us

कोकणातील कथा असली तरी संपूर्ण ही महाराष्ट्राची व्यथा; शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे 'दशावतार' पाहून काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:28 IST

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे 'दशावतार' सिनेमा पाहिला आहे. सहकुटुंब सहपरिवार उद्धव ठाकरेंनी दशावतारचा आस्वाद घेतला आहे.

‘दशावतार' हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने सात दिवसात कोट्यावधींची कमाई केली आहे. ‘दशावतार'निमित्ताने मराठी चित्रपटाची पुन्हा एकदा आंततराष्ट्रीय स्तरावर चर्चा होत आहे. राजकीय व्यक्तींपासून ते विविध मराठी-हिंदी कलाकार ‘दशावतार'चं कौतुक करताना दिसत आहेत. अशातच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब ‘दशावतार'चा आस्वाद घेतला आहे. ‘दशावतार' पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.‘दशावतार'पाहून उद्धव ठाकरे काय म्हणाले? ‘दशावतार' पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मनातील भावना शेअर केल्या. ते म्हणतात, ''या चित्रपटाची कथा जरी कोकणातील असली तरी व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आज आपण कुठे आहोत नि कुठल्या दिशेने चाललो आहोत, हे वेळीच ओळखलं नाही तर आपण एका कडेलोटाच्या टोकावर आहोत, हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. सगळ्यांचीच कामं उत्तम आहेत. पण दिलीप प्रभावळकर यांनी जे करून ठेवलंय ते अद्भुत आहे. सुबोध खानोलकर या तरूण दिग्दर्शकाने एक परिपूर्ण चित्रपट मराठीला दिलाय. अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राचा महासिनेमा ‘दशावतार’ चित्रपटाची प्रशंसा केली.''

उध्दव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘दशावतार ‘ चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी उध्दवजींसह शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत ,शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले, मिलिंद गुणाजी, राणी गुणाजी आणि जागतिक कीर्तीच्या अभिनेत्री छाया कदम उपस्थित होत्या.

‘दशावतार ‘ चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या कामाची उद्धव ठाकरेंनी प्रशंसा केली. आणि चित्रपटातील कलाकार सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, अजित भुरे यांच्यासह संपूर्ण टीमचे कौतुक केले. आपण कित्येक काळानंतर मराठीत असा भव्य चित्रपट पाहिला, ही भव्यता, हे सौंदर्य रसिकांनी रूपेरी पडद्यावरच अनुभवायला हवे. केवळ कोकणातील लोकांनीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने ही कलाकृती मोठ्या पडद्यावर पहायला हवी, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.  

तसंच ‘दशावतार’ ने मराठी चित्रपटाला जी भव्यता मिळवून दिली त्याबद्दल झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर, निर्माता सुजय हांडे, सुबोध खानोलकर , ओंकार काटेसह ‘दशावतार'च्या सर्वच निर्मात्या मंडळींचे उद्धव यांनी अभिनंदन केलं.

टॅग्स :उद्धव ठाकरेआदित्य ठाकरेदिलीप प्रभावळकर मराठी चित्रपट