Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्याचा निर्णय टोकाचा...", आस्ताद काळेने कलावंत पथक सोडल्यानंतर सौरभ गोखले पहिल्यांदाच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 17:14 IST

सौरभ गोखलेने पहिल्यांदाच या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील गणेशोत्सव म्हणलं की चर्चा असते ती कलावंत ढोलताशा पथकाची. २०१४ साली या ढोलताशा पथकाची स्थापना करण्यात आली. सौरभ गोखले, अनुजा साठे, आस्ताद काळे, श्रुती मराठे या कलाकारांनी एकत्र येऊन या पथकाची स्थापना केली. मात्र आस्तादने या पथकाचा आणि माझा काहीगही संबंध नसल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं. त्यांच्यात नक्की काय वाद झाले ज्यामुळे त्याने हा निर्णय घेतला हे काही समोर आलं नव्हतं.  आता अभिनेता सौरभ गोखले पहिल्यांदा यावर व्यक्त झाला आहे. 

'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत सौरभ गोखले म्हणाला, "त्याच्यात वाद असं नाही...आता कुठलाही ग्रुप आपण घेतला म्हणजे अगदी चार मित्रांचा जरी ग्रुप पाहिला तरी त्यांच्यात मतभेद किंवा थोडेसे वाद होतातच. एखाद्याला अमुक योग्य नाही वाटत दुसऱ्याला तमुक नाही वाटत. असेच काही मतभेद आमचे त्याच्याबाबतीत होते आणि आमच्याबाबतीतही होते. आम्हाला एक गोष्ट योग्य वाटली नाही आणि त्याला काही गोष्टी नाही पटल्या."

तो पुढे म्हणाला, "फक्त त्याने जो निर्णय घेतला तो त्याला जरी योग्य वाटला असेल तरी आम्हाला तो टोकाचा वाटला. काहीच गरज नव्हती. कुठलीही गोष्ट आपल्याला आवडत नाही म्हणून ती सोडणं हा उपाय असू शकत नाही. पण ठिके तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. त्यामुळे आमच्यातलं कोणीही सोशल मीडियावर त्याच्यावर रिअॅक्ट झालं नाही. कारण आम्हाला माहित आहे की ही आमच्यातली अंतर्गत गोष्ट आहे."

आस्तादने महिनाभरापूर्वी ही पोस्ट केली होती. त्याच्या पोस्टमधून तो काहीसा नाराजही दिसला होता. कलावंत ढोलताशा पथकाची सध्या जोरदार तालीम सुरु असल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळतंय. मात्र यावेळी आस्ताद याचा भाग नसणार आहे.

टॅग्स :सौरभ गोखलेअस्ताद काळेमराठी अभिनेतापुणेगणेशोत्सव