सचिन पिळगावकर आणि संजीव कुमार या दोघांनी शोले सिनेमात एकत्र काम केलं होतं. संजीव कुमार आणि सचिन यांची चांगली मैत्री होती. संजीव कुमार यांच्या निधनाचा सचिन यांना मोठ धक्का बसला होता. संजीव यांचं निधन झालं तेव्हा सचिन त्यांच्याच घरी उपस्थित होते. मन हेलावून टाकणारी ती घटना सचिन यांनी सांगितली आहे. एका मुलाखतीत सचिन पिळगावकरांनी ही घटना सविस्तर सांगितली.
कसं झालं संजीव कुमार यांचं निधन?
बॉलिवूड आज और कल या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर म्हणाले, "मी संजीव कुमार यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी त्यांना भेटलो होतो. संजीवजी तेव्हा डबिंग करत होते. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सकाळी घरी बोलावलं होतं. पण मी त्यांना म्हणालो, मी दुपारी अडीचच्या सुमारास येऊन. त्यांनी काहीवेळ विचार केला. थोडा लवकर येऊ शकत नाही का, असं मला म्हणाले. मी म्हटलं, एक काम आहे ते करुन येतो."
"मी पुढे दुसऱ्या दिवशी अडीचच्या सुमारास त्यांच्या घरी गेलो. मला सांगण्यात आलं की, हरी भाई बेडरुमच्या बाथरुममध्ये अंघोळ करत आहेत. मी अर्धा तास थांबलो. तब्येत ठीक नाही का त्यांची? असं इतरांना विचारलं. त्यांचे सेक्रेटरी डॉ, गांधींना घेऊन आले. हरी भाईंना उलटी झाली होती. त्यात रात्री तीन-चार वाजता घरी आले होते. मी म्हटलं, आता बाहेर आले की, ओरडतो त्यांना. ते माझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड होते. त्यामुळे अशी कोणतीही गोष्ट नव्हती जी आम्ही एकमेकांसोबत शेअर करत नव्हतो."
"तरीही अर्धा तास मी थांबलो. डॉक्टरही बाजूला बसले होते. मला संशय आला. सर्व बेडरुममध्ये जायला घाबरत होते. मी म्हटलं, आत जाऊन बघतो. जर ते कपडे बदलत असतील तर सॉरी म्हणून पुन्हा परत येतो. मी त्यांच्या बेडरुमच्या दरवाजाजवळ पोहोचलो. स्लाईंडिंग दरवाजा होता तो मी उघडला. मला समोर कोणीच दिसलं नाही परंतु खाली मला दोन पाय दिसले. ते कार्पेटवर पडलेले होते. मला समजलं नाही."
"मी डॉक्टरांना जोरात आवाज देत किंचाळलो. डॉक्टर धावत आले. संजीवजींना त्यांनी सरळ केलं. छातीवर दाब दिला. पण खूप वेळापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं, असं आम्हाला कळालं. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. ते फक्त ४६ वर्षांचे होते.", अशाप्रकारे सचिन पिळगावकरांनी संजीव कुमार यांच्या मृत्यूची मन हेलावणारी घटना सांगितली.