प्राजक्ता माळी (Prajakta Mali) महाराष्ट्रातील जनतेची लाडकी अभिनेत्री आहे. स्वत: निर्मित केलेल्या 'फुलवंती' सिनेमाचं यश ती सध्या एन्जॉय करत आहे. प्राजक्ताच्या सौंदर्यावर, तिच्या एकूणच व्यक्तिमत्वावर चाहते फिदा असतात. तिच्या सोशल मीडियावर कमेंट करत तर अनेकजण थेट तिला लग्नाची मागणी घालतात. मात्र प्राजक्ता लग्न का करत नाही, तिचे लग्नाबद्दलचे विचार काय यावर ती नुकतंच दिलखुलासपणे बोलली आहे.
प्राजक्ता माळीला 'लग्न कधी करणार?' हा प्रश्व नेहमीच विचारला जातो. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "मी लग्न करावं म्हणून आई हात धुऊन माझ्या मागे लागली आहे. मी इतके दिवस तिला फुलवंती झाल्यानंतर...फुलवंती झाल्यानंतर...असंच सांगत होते. तिलाही माहित होतं की मला श्वास घ्यायलाही फुरसत नाहीए. आता फुलवंती संपलाय तर तिचं पुन्हा सुरु झालं आहे. त्यामुळे आता मला भीती वाटत आहे. मी एके ठिकाणी वाचलं होतं की तीन गोष्टींमुळे कोणतेही निर्णय होतात. एक जे आपोआपच होतात जणू देवच तुमच्यासाठी ठरवतो. जसं माझं इंडस्ट्रीत येणं आपोआप ठरलं. कोणी तसा निर्णय घेतला नव्हता पण ते झालं. दुसरं म्हणजे आपण मुद्दामून निर्णय घेतो. जसं फुलवंती करायचा हा माझा निर्णय होता. आपल्याला आतून ती गोष्ट पुश करते आणि तुम्ही तो निर्णय घेता. तिसरं म्हणजे जेव्हा तिसराच व्यक्ती आपल्यासाठी निर्णय घेतो. जसं की आई वडील आपल्या डोक्यावर बसतात आणि बळजबरी ते करवून घेतात.
त्यामुळे पहिल्या दोन कॅटेगरीत तर माझं लग्न होणार नाही. आपोआप तर नक्कीच होणार नाही हे मला माहित आहे. युनिव्हर्सलाच मी सिंगल राहायला हवं आहे. मी पण लग्नाच्या झोनमध्ये नाही. आईची खूप इच्छा आहे की माझं लग्न व्हावं. जे प्रत्येक आईबापाला हवंच असतं.
ती पुढे म्हणाली, "मला वाटतं आमच्या इंडस्ट्रीत तर ते खूप अवघड आहे. तसंच आपल्याला सगळंच मिळेल असं नाही. तुम्हाला पैसा, प्रसिद्धी मिळाली हा पण आता प्रेम मिळणार नाही. सगळंच देव कसं देईल हे मी स्वीकारलं आहे. तो एक प्रकारचा त्याग आहे जो मी स्वीकारला आहे. पण कधी पुढे लग्न झालं नाही झालं तरी मी कौटुंबिक आयुष्याला प्राधान्य देऊ शकत नाही. नवरा, मुलं हे इतकं छोटं आयुष्य मी जगू शकत नाही. जेव्हा की मी १०० अनाथ मुलांचा सांभाळ करु शकते. मी अख्ख्या शहराला प्रभावित करु शकते मग का म्हणून मी फक्त माझ्याच फॅमिलीचा विचार करु. मी फ्रंट सीट आणि नवरा बॅक सीटवर असं पाहिजे. आता माझे हे विचार कोणी समजू शकला आणि तो जर मला माझ्या आयुष्यात आपोआपच आला तर तेव्हा मी तो निर्णय घेईल. पण त्याला शोधण्यासाठी मी प्रयत्न करणार नाही हेही नक्की."