'गुलकंद' सिनेमाची (gulkand movie) सध्या सगळीकडे चर्चा आहे. आज १ मे रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सिनेमाचे सर्वेसर्वा सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. काल या सिनेमाचा ग्रँड प्रिमिअर मुंबईत झाला. या प्रिमिअरला महाराष्ट्राची हास्यजत्राचे सर्व कलाकार याशिवाय प्राजक्ता माळीही सहभागी झाली होती. प्राजक्ता माळीने गुलकंद सिनेमा पाहून तिची खास प्रतिक्रिया दिली आहे, ती चर्चेत आहे.
प्राजक्ता माळी 'गुलकंद' पाहून काय म्हणाली
प्राजक्ता माळीने 'गुलकंद'च्या प्रिमिअरच्या वेळेस सर्व कलाकारांसोबतचा फोटो शेअर केलाय. हा फोटो पोस्ट करुन सिनेमाविषयी प्राजक्ता लिहिते की, गुलकंदाप्रमाणेच गोड, प्रवाळ, गुणकारी असा “गुलकंद” चित्रपट. सगळ्यांचीच कामं झक्कास झालीयेत. सई ताम्हणकर, प्रसाद ओक, ईशा डे, सचिन गोस्वामी, सचिन मोटे खूप प्रेम. पण समीर चौघुले दादाने विशेष भारी काम केलंय. संपूर्ण कुटुंबानं मिळून पहावा असा सिनेमा… आजपासून सगळ्या महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय, नक्की पहा.., अशी पोस्ट करुन प्राजक्ताने तिच्या मनातील भावना शेअर केल्या आहेत.
'गुलकंद' सिनेमाविषयी
सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका असून सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा आज १ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय. आज सगळीकडे या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय.