सचिन पिळगावकरांनी मुलाखतीत 'शोले' मधील अमजद खानला गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी संवाद बोलायला मी शिकवलं होतं, याचा खुलासा केला होता. या वक्तव्यावरुन सचिन पिळगावकर यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. अशातच राजकीय नेते जितेंद्र आव्हाड यांनी सचिन पिळगावकरांची चांगलीच फिरकी घेतली. जितेंद्र आव्हाडांनी x वर ट्विट करुन लांबलचक पोस्ट लिहिली. यात त्यांनी त्यांची नाराजी प्रकट केली.
जितेंद्र आव्हाड पोस्ट करुन लिहितात, "शोले हा सिनेमा १९७५ साली रिलीज झाला. त्यावेळी सिनेरसिकांनी शोले सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला होता. त्यातील एक - एक डायलॉग त्यावेळच्या पिढीच्या तोंडावर होता. डाकू, दरोडेखोर यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र, शोलेमध्ये अमजद खान यांनी साकारलेला गब्बरसिंग जेवढा गाजला, मला नाही वाटत तेवढा कोणता अभिनेता दरोडेखोराच्या भूमिकेमध्ये गाजला असेल."
"गब्बरसिंग अन् अमजद खान ही हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर नावे आहेत. पण, हे काही मनाला पटले नाही की, गब्बरसिंग म्हणजेच अमजद खान यांना डायलॉग फेकण्याचे कौशल्य- आदब हे त्या सिनेमातील बालकलाकार सचिन पिळगावकर याने शिकवली. कारण, अमजद खान यांचे वडील झकारिया खान अर्थात जयंत हेदेखील १९५०-६० च्या दशकातील नामांकित अभिनेते होते. म्हणजेच चित्रपटसृष्टीत खानदान असलेल्या अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी, हे पचनी पडतच नाही. आज अमजद खान आपल्यात नाहीत आज ही जो कोणी शोले बघेल तो अमजद खान म्हणजेच गब्बर सिंग ला विसरूच शकत नाही." अशाप्रकारे जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट करुन त्यांची नाराजी व्यक्त केली.