Join us

'मराठी मनोरंजन विश्वात घडल्याचं माहिती नाही..'; समीर चौघुलेसाठी प्रसाद ओकची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 14:57 IST

Prasad oak: उत्तम अभिनेता असण्यासोबतच प्रसाद एक उत्तम व्यक्ती असल्याचंही त्याने वारंवार दाखवून दिलं आहे.

कलाविश्वात असे फार मोजके कलाकार पाहायला मिळतात जे एकमेकांच्या कामाचं दिलखुलासपणे कौतुक करतात. त्यातलाच एक अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे प्रसाद ओक (prasad oak). उत्तम अभिनेता असण्यासोबतच प्रसाद एक उत्तम व्यक्ती असल्याचंही त्याने वारंवार दाखवून दिलं आहे. कलाविश्वातील कोणत्याही कलाकाराने उत्तम, वाखाणण्याजोग काम केलं की, प्रसाद जाहीरपणे त्याचं कौतुक करतो. यावेळीदेखील त्याने अशाच एका अभिनेत्याचं कौतुक करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीच्या जोरावर अल्पावधीत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे समीर चौघुले (sameer chougule). 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या समीरचा आज वाढदिवस. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र, यात प्रसादने केवळ शुभेच्छा दिल्या नाहीत. तर, त्याचं कौतुकही केलं आहे.

"समीर चौघुले .."मोठ्ठा" हो.."मोठ्ठी" उंची गाठ. आमचा अत्यंत लाडका अभिनेता आणि सच्चा मित्र...!!! वाढदिवसाच्या अनंत कोटी  शुभेच्छा मित्रा...!!!"एखाद्या अभिनेत्याच्या तोंडची वाक्यं एवढी प्रसिद्ध व्हावीत...कि त्या वाक्यांचा brand बनावा आणि त्याचे T-shirts यावेत. " हे असं काही या आधी कधीही मराठी मनोरंजन विश्वात घडल्याचं मला तरी माहिती नाही. या बद्दल समीर चं प्रचंड अभिनंदन...!!!  आणि या साठी @pulaanimandali यांनी जे काही केलंय त्याचंही खूप खूप कौतुक...!!! सम्या... उत्तरोत्तर तुला अशी खूप खूप धमाल वाक्यं सुचो... त्याचे हजारो  T-shirts बनो आणि ते घालण्याची आणि तुझी वाक्यं छातीवर अभिमानाने मिरवण्याची संधी आम्हा पामरांना वारंवार मिळो हीच प्रार्थना...!!!!" , अशी पोस्ट प्रसाद ओकने शेअर केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर समीर चौघुले त्याच्या उत्तम स्क्रिप्टसाठी आणि उत्तम सादरीकरणासाठी ओळखला जातो. यामध्येच मोठा हो वा मोठी हो हा त्याच्या तोंडचा संवाद सुपरहिट झाला. त्यामुळेच या वाक्याचं टी-शर्ट सध्या बाजारात दाखल झालं आहे. म्हणूनच, एका मराठी कलाकाराची अशा प्रकारे दखल घेत जात असल्याप्रकरणी प्रसादने त्याचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :प्रसाद ओक समीर चौगुलेसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा