Join us

"त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकत नाही"; नाना पाटेकरांनी केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक, म्हणाले- "मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 12:14 IST

साताऱ्यातील एका कार्यक्रमात नाना पाटेकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र आले. त्यावेळी प्रसारमाध्यमांसमोर नाना पाटेकरांनी एकनाथ शिंदेंचं खूप कौतुक केलं

मनोरंजन विश्वातील अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) हे सर्वांचे आवडते अभिनेते. नाना पाटेकर यांचे महाराष्ट्रातील अनेक राजकीय व्यक्तींशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. नाना पाटेकर अनेकदा जाहीरपणे राजकारणातील परिस्थितीबद्दल त्यांचं मत व्यक्त करताना दिसतात. अशातच नाना पाटेकर यांनी एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. नाना पाटेकर आणि एकनाथ शिंदे (eknath shinde) साताऱ्यातील 'गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार' या योजनेतील कार्यक्रमात सहभागी झाले होते. या दोघांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. 

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, "याच्यावर कुठलंही किटाळ नाहीये. हे सफेद म्हणजे सफेदच. त्यावर एकही डाग नाही. हे सांभाळणं फार कठीण असतं. मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे कोणी असं बोट दाखवू शकत नाही. त्याच्यापेक्षा अजून काय लागतं. देवेंद्र आहेत, अजित आहेत. देवेंद्र (देवेंद्र फडणवीस) सुद्धा माझे अतिशय चांगले मित्र आहेत. अजितही (अजित पवार) आहे."

"पण याला मी खूप आधीपासून ओळखतो. खूप आधीपासून म्हणजे साधे कार्यकर्ते होते तेव्हापासून मी यांना ओळखतो. जे सातत्य आहे त्याची कमाल आहे. आणि पुन्हा तसंच बोलणं, तसंच वागणं, तसंच राहणं. मुख्यमंत्री झाल्यानंतर थोडा कपड्यामध्ये फरक होतो. तो फरक होतो त्याला नाही काही करु शकत. पण असे मित्र असणं हा एक आनंद आहे." अशाप्रकारे नाना पाटेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. नाना पाटेकर लवकरच 'हाउसफुल्ल ५' या सिनेमात झळकणार आहेत.

 

टॅग्स :नाना पाटेकरएकनाथ शिंदेसातारादेवेंद्र फडणवीसअजित पवार