Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही सगळं स्वप्न वाटतंय!; जब्या - शालूचा रोमँटिक फोटो व्हायरल, राजेश्वरीच्या कॅप्शनची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:48 IST

फँड्री मधील शालू आणि जब्याचा रोमँटिक फोटो व्हायरल झाला आहे. अनेकांना या दोघांनी लग्न केलंय असं वाटतंय

'फँड्री' सिनेमा सर्वांना माहित असेलच. या सिनेमात जब्या आणि शालूची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. सिनेमा रिलीज होऊन इतकी वर्ष झाली पण या जोडीला प्रेक्षक विसरले नाहीत. 'फँड्री' सिनेमात शालूचं प्रेम मिळवण्यासाठी जब्या काळ्या चिमणीची राख मिळवण्याचा प्रयत्न करतो. आजही ही संकल्पना अनेकांच्या डोक्यात आहे.  अशातच जब्या आणि शालू अर्थात राजेश्वरी खरात (rajeshwari kharat) आणि सोमनाथ अवघडे यांचा एक रोमँटिक फोटो व्हायरल झालाय.

राजेश्वरी-सोमनाथचा रोमँटिक फोटो व्हायरल

राजेश्वरी - सोमनाथचे तीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये राजेश्वरी आणि सोमनाथ नवीन लग्न झालेल्या दाम्पत्यासारखे एकदम रोमँटिक अंदाजात एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. राजेश्वरीने डोक्यावर टॉवेल गुंडाळला आहे. तर सोमनाथ तिचा हात पकडून रोमान्स करताना दिसतोय. 'अजूनही मला वाटतं स्वप्न आहे सगळं', असं खास कॅप्शन देऊन राजेश्वरीने हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोखाली दोघांच्याही चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.

राजेश्वरी-सोमनाथच्या फोटोवर चाहत्यांच्या मजेशीर कमेंट्स

राजेश्वरी-सोमनाथचा फोटो पाहून दोघांच्याही चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. "जब्या मला पण दे की काळ्या चिमणीची राख", "अखेर फँड्री पूर्ण झाला", "जाती पातीचा दगड अखेर विजयी झाला", "या दोघांनी खरंच लग्न केलं का?" अशा मजेशीर कमेंट्स करत चाहत्यांनी त्यांच्या फोटोला पसंती दर्शवली आहे. राजेश्वरी-सोमनाथ हे त्यांच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून त्या सिनेमाच्या सेटवरील फोटो ते पोस्ट करत आहेत, अशी चर्चा आहे. पण दोघांनीही यामागील खरी गोष्ट अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे.

टॅग्स :राजेश्वरी खरातमराठी चित्रपटटेलिव्हिजन