Join us

रंगभूमीवर सादर होणार 'एक होता मास्तर' हा अनोखा नाट्यप्रयोग; कधी आणि कुठे बघाल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 14:46 IST

हा नाट्यप्रयोग शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे. तुम्हालाही हे नाटक पाहायचं असेल तर बातमीवर क्लिक करुन सविस्तर माहिती जाणून घ्या

मराठी रंगभूमीवर सध्या विविध नाटकांचे प्रयोग होत आहेत. प्रायोगिक आणि व्यावसायिक धाटणीची अनेक नाटकं रंगभूमीवर सादर होत आहेत. अशातच मराठी रंगभूमीवर एका आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळणार आहे. नेरुळ, नवी मुंबईतील काही हौशी रंगकर्मी एकत्र येऊन नाट्यरसिकांसाठी एक अनोखी पर्वणी घेऊन येणार आहेत. या नाटकाचं नाव आहे 'एक होता मास्तर'. या नाटकाचा प्रयोग कधी आणि कुठे बघायला मिळणार? जाणून घ्या.कधी आणि कुठे होणार प्रयोग?

'माझी काटेमुंढेरीची शाळा' या गो.ना. मुनघाटे लिखित प्रसिद्ध कादंबरीवर आधारीत 'एक होता मास्तर' हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. पुण्याच्या साधना प्रकाशनाने २००३ साली प्रकाशित केलेल्या या कादंबरीचा महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट वाड‌मय पुरस्कार देऊन गौरव केला आहे. याच कादंबरीवर आधारीत ' एक होता मास्तर' हा नाट्य दीर्घांक येत्या २० ऑगस्टला रात्री ८.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथील मिनि थिएटरमध्ये सादर होणार आहे.

तिकिट कशी मिळवाल?

या कादंबरीचे नाट्य रूपांतरकार श्री. अनिल मुनघाटे यांनी केलं आहे. काहीसा प्रायोगिक वळणाने जाणारा हा दीर्घांक प्रत्यक्ष रंगमंचावर अनुभव घेण्यासारखा आहे. नेरुळ, नवी मुंबई भागात राहणाऱ्या हौशी रंगकर्मी आणि विद्यार्थ्यांनी या प्रयोगात कलाकार म्हणून सहभाग घेतला आहे. या नाटकात उत्कृष्ट प्रसंगांना सुरेल संगीत आणि नृत्याचीही जोड देण्यात आली आहे. नाटकाच्या प्रवेशिका 'बुक माय शो' या ऑन लाईन तिकीट साईटवर उपलब्ध असून हा प्रयोग विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मोफत आहे. महाराष्ट्रातील रसिक-प्रेक्षक या प्रयोगाला हाउसफुल्ल गर्दी करतील, अशी 'एक होता मास्तर'च्या टीमला आशा आहे.

काय आहे नाटकाचा विषय?

महाराष्ट्र राज्याच्या पूर्वसीमेवरील घनदाट अरण्यात सत्तरच्या दशकात एक रानशाळा सुरु होते. दुर्गम भागातील गोंड आदिवासींच्या एका पाड्यावर असलेल्या या शाळेची पडझड झालेली असते. अशातच एक मास्तर तिथे पोहोचतो आणि ही शाळा जणू काही पुनर्जन्म घेते. हा मास्तर या शाळवर अज्ञानाची जी धूळ बसली आहे, ती साफ करतो आणि शाळेला नवसंजीवनी देतो. मराठी नाटकांच्या गौरवशाली इतिहासात 'एक होता मास्तर' हे नाटक एक आगळावेगळा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे.

टॅग्स :नाटकटिव्ही कलाकारटेलिव्हिजनमराठी अभिनेतामराठी चित्रपटमराठी गाणीमराठी नाट्य संमेलनमराठी साहित्य संमेलन