Dashavtar: जो मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे तो म्हणजे 'दशावतार'. सध्या जिकडे तिकडे या एकाच सिनेमाची चर्चा ऐकायला मिळत आहे. 'दशावतार' सिनेमातून कोकणातील परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवण्यासोबतच दशावतार सादर करणाऱ्या एका कलाकाराची कहाणी उत्तमरित्या गुंफवून दाखवण्यात आली आहे. दिलीप प्रभावळकर आणि इतर कलाकारांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. हा सिनेमा पाहून प्राजक्ता माळीदेखील भारावून गेली आहे.
प्राजक्ताने 'दशावतार'च्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. 'दशावतार' पाहिल्यानंतर प्राजक्ताने इन्स्टाग्राम स्टोरीमधून सिनेमाबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने 'दशावतार' सिनेमा काळजाला भिडणारा असल्याचं म्हटलं आहे. तर प्रियदर्शिनी इंदलकरचं कौतुकही प्राजक्ताने केलं आहे. प्राजक्ता म्हणते, "मी नुकतंच दशावतारचं स्पेशल स्क्रिनिंग पाहिलं. अप्रतिम असा सिनेमा झालेला आहे. सगळ्यांची कामं, विषय, सिने ब्युटी जी दाखवली आहे आणि इमोशन तुमच्या थेट काळजाला हात घालतात. तर प्लीज थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहा. संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे. सुबोध खानोलकर आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा खूप छान काम केलंय".
प्रियदर्शिनीबद्दल प्राजक्ता म्हणाली, "आमची मैत्रीण पण आहे प्रियदर्शिनी इंदलकर. तिने देखील खूप छान काम केलंय. खूप गोड दिसलीस प्रिया...प्रियाचे व्हेरिएशन्स सिनेमात दिसले. ती पहिल्या भागात वेगळी दिसते आणि मध्यंतरानंतर वेगळी दिसते". १२ सप्टेंबर रोजी 'दशावतार' सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सिनेमात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर भरत जाधव, महेश मांजरेकर, अभिनय बेर्डे हे कलाकारही झळकले आहेत. सुबोध खानोलकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.