अभिनेत्री छाया कदम (chhaya kadam) या मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. मराठी, हिंदी, साऊथ सिनेमांपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिनेमांपर्यंत छाया कदम यांची ओळख आहे. अलीकडेच 'लापता लेडीज' या सिनेमात त्यांनी प्रभावी भूमिका साकारली आहे. परंतु सध्या त्या कायदेशीर अडचणीत सापडल्या आहेत. छाया यांनी एका रेडिओ मुलाखतीत वन्य प्राण्यांचे मांस खाल्ल्याचे कबूल केल्याने महाराष्ट्र वन विभागाने त्यांच्या विरोधात चौकशी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं प्रकरण काय?
छाया कदम कायदेशीर कचाट्यात
मुंबईमध्ये असलेल्या 'प्लांट अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी' (PAWS) या स्वयंसेवी संस्थेने ठाण्याचे मुख्य वनसंरक्षक आणि विभागीय वन अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार छाया कदम यांनी हरीण, ससा, रानडुक्कर, घोरपड आणि साळींदर यांसारख्या संरक्षित प्रजातींच्या प्राण्यांचे मांस खाल्ल्याचे विधान केले आहे. प्राण्यांच्या या सर्व प्रजाती वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षित आहेत. या प्राण्यांची शिकार करणे किंवा मांस खाणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.
त्यामुळे या तक्रारीच्या आधारे वन विभागाने अभिनेत्रीची अधिकृत चौकशी सुरू केली असल्याचं म्हणणं आहे. यासाठी विशेष असं पथक नेमण्यात आलंय. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, छाया कदम यांच्यावर कारवाई करणे हे या पथकाचे उद्दिष्ट नाही, तर या प्राण्यांच्या मांसाचा पुरवठा करणाऱ्या शिकाऱ्यांचा शोध घेणे आणि त्यांच्यावरही कठोर कारवाई करणे आहे, हा आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी राकेश भोईर यांनी सांगितले की, "आम्ही छाया कदम यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता, त्या सध्या व्यावसायिक कामासाठी शहराबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले. त्या चार दिवसांनी परत येतील आणि कायदेशीर सल्ला घेऊन चौकशीसाठी हजर होतील असे त्यांनी कळवले आहे." या प्रकरणामुळे छाया कदम यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विधानामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चुकीचा संदेश पोहोचू शकतो, असे PAWS या एनजीओने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.