sharvari Jamenis : १९९९ साली प्रदर्शित झालेल्या 'बिनधास्त' हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री शर्वरी जमेनीस (sharvari jamenis) घराघरात पोहोचली. या चित्रपटातून तिला नवी ओळख मिळाली. त्यानंतर शर्वरीने सावरखेड एक गाव तसेच बॉईज या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शर्वरी जमेनीस एक उत्तम अभिनेत्री आहेच त्याशिवाय उत्कृष्ट कथ्थक नृत्यांगणा देखील आहे. आपल्या करिअरमध्ये तिने काही मोजकेच चित्रपट केले पण त्या चित्रपटांतील भूमिकेने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या ही अभिनेत्री एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने अभिनय क्षेत्रातील अनुभव कथन केले.
अलिकडेच अभिनेत्री शर्वरी जमेनीसने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने हिंदी चित्रपटात काम करताना आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं आहे. त्याविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, "मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही पण, मी एक हिंदी चित्रपट केला होता. त्याचे दिग्दर्शक मराठीच होते. बिग बजेट चित्रपट आणि त्यामध्ये स्टारकास्ट मोठी होती. त्या चित्रपटाच्या माध्यमातून मला खूप काही शिकायला मिळेल म्हणून मी त्यासाठी होकार दिला. गोरेगाव फिल्मसीटीत सेट लागला होता. पण, जे मेन लीज करत होते त्या सगळ्यांच्या डेट्स मागवल्या होत्या. असं असूनही त्यांना वेळेचं नियोजन का करता आलं नाही सांगता येत नाही. तिथे मी आठवडाभर एकही सीन न देता फक्त बसून होते.
त्यानंतर अभिनेत्रीने म्हटलं, "तेव्हा मला रोज सांगितलं जायचं की उद्या शूट असेल आणि पहाटे ५ चा कॉल टाईम दिला जायचा. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी ५ लाा परत येतो की तुमचं शूटिंग आज होणार नाही, उद्या होईल. शूटिंगसाठी जेवढे दिवस मागितले आहेत ते नाही झालं तरी त्याचे पैसे आपल्याला मिळणार आहेत. मग शूट नाही झालं तर काही फरक पडणार नाही. असं मला जमत नव्हतं. असं सगळं घडलं. मग मी त्या हिंदी माहोलमध्ये रमले नाही. मराठीत असं घडत नाही."
त्या लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचल्या नसाव्यात...
"प्रत्येकाचे वेगवेगळे युनिट्स असल्यासारखं सगळं वातावरण होतं. फराह खान कोरिओग्राफर होत्या त्यांच्या सगळ्या लोकांसाठी एक बॉय होता, जो कोणाला काय हवंय त्याच्यांकडे लक्ष द्यायचा. पण, मधले जे कलाकार होते त्यांना विचारणारं कोणीच नव्हतं. कदाचित त्या लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचल्या नसाव्यात."असा खुलासा अभिनेत्रीने या मुलाखतीत केला.