Join us

"मला वडील नाहीत, माझे वडील बनाल का? तो प्रश्न अजूनही...", विजू मानेंची प्रिया मराठेबद्दल डोळे पाणावणारी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 16:07 IST

Viju Mane on Priya Marathe Death: "गोष्ट अशी संपायला नको होती प्रिया...", विजू मानेंची प्रिया मराठेबद्दल डोळे पाणावणारी पोस्ट

Priya Marathe Death: आजची सकाळ पुन्हा मराठी सिनेसृष्टीला दुःखद धक्का देणारी ठरली. लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे ३८ व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे. गेल्या अडीच वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. अखेर कर्करोगाशी तिची सुरू असलेली झुंज अपयशी ठरत आज दि. ३१ ऑगस्ट २०२५ ला मिरा रोडवरील राहत्या घरी पहाटे चार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. प्रिया मराठेच्या निधनाची बातमी कलाकारांच्या मनाला चटला लावणारी आहे. मराठीसह हिंदी कलाविश्वातील सेलिब्रिटी अभिनेत्रीच्या निधनामुळे शोक व्यक्त करत आहे.

त्यात आता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने यांनी  प्रिया मराठेच्या निधनानंतर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

विजू माने यांनी प्रिया मराठेला आपली लेक मानलं होतं. तिच्या बाबतीत हे असं घडल्याचं कळताच त्यांना प्रचंड दु ख झालं आहे. आपल्या भावनांना मोकळीक करुन देण्यासाठी विजू मानेंनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवर भावुक पोस्ट लिहित म्हटलंय, "A fairytale ends...", मला वडील नाहीत, माझे वडील बनाल का?" हा तिने विचारलेला प्रश्न अजूनही कानात आहे. सssssssर अशी मोठ्यान्ने हाक मारून अक्षरशः लहान मुलीसारखी बिलगायची. माझ्या बायकोहून जास्त वयाच्या ह्या पोरीला मी मनापासून 'लेक' मानलं होतं. "

यापुढे विजू मानेंनी लिहिलंय की, "बांदोडकर काॅलेजात एक माॅब प्ले केला होता. अ फेअरी टेल...प्रियाचं रंगभूमीवरलं पहिलं काम. तिला अगदी बोटाला धरून एकांकिकेत आणलं. राजकन्या होती त्यात ती. तेच बोट धरून माझ्या आयुष्यात वावरली. माझ्या मुलीला मी सांगायचो, तुझ्याआधी मला एक मुलगी आहे बरं का... तिच्या आयुष्यातले खूप चढ उतार पाहिले. शंतनुसारखा गोड मुलगा तिला मिळाला. खूप बरं वाटलं होतं. गोष्ट अशी संपायला नको होती प्रिया. बाबा मिस यू...बाबा लव्ह यू." अशी डोळे पाणावणारी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने यांनी अनेक हिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले. 'शिकारी', 'शर्यत', 'बायोस्कोप', 'पांडू', 'खेळ मांडला' हे त्यांचे गाजलेले सिनेमे. चित्रपटांबरोबरच विजू माने 'स्ट्रगलर साला' या युट्यूब सीरिजसाठी ओळखले जातात.

टॅग्स :प्रिया मराठेविजू मानेसेलिब्रिटी गणेशमृत्यूटिव्ही कलाकार