Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रिय खलनायक काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध अभिनेते कमल यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:49 IST

हृदयविकाराच्या झटक्याने मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कमल रॉय यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. चेन्नई येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. कमल रॉय यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहते आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत.

कमल रॉय यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी सिनेसृष्टीशी संबंधित होती. ते लोकप्रिय अभिनेत्री उर्वशी, कलारंजिनी आणि दिवंगत अभिनेत्री कल्पना यांचे बंधू होते. अभिनयाचा वारसा घरातच असल्याने त्यांनीही सिनेसृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांचे आजोबा पद्मश्री सुरांद कुंजन पिल्लई हे ख्यातनाम लेखक आणि संशोधक होते.

कमल रॉय यांनी प्रामुख्याने मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी 'सयूज्यम', 'कोलीलाक्कम', 'मंजू', 'किन्निनी', 'कल्याणा सौगंधिकम', 'वाचलम' आणि 'द किंग मेकर' यांसारख्या अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ते त्यांच्या गंभीर आणि खलनायकी भूमिकांसाठी ओळखले जात असत. चित्रपटांसोबतच त्यांनी 'शारदा' सारख्या टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केले होते.

प्रसिद्ध दिग्दर्शक विनयन यांनी कमल रॉय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, "अभिनेता कमल रॉय यांचे निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली. माझ्या 'कल्याणा सौगंधिकम' या चित्रपटात त्यांनी दिलीपच्या विरोधात खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या आठवणी कायम राहतील."

कमल रॉय यांनी एका मुलाखतीत आपल्या जीवनातील संघर्षाबद्दल आणि काही चुकांबद्दल प्रांजळपणे भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही कोणाकडे काम मागितले नाही. आयुष्यात आलेले चढ-उतार आणि भविष्यासाठी पैसे साठवून न ठेवल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली होती. आईसाठी काहीतरी करण्याची त्यांची शेवटची इच्छा अपूर्ण राहिल्याची भावना त्यांच्या चाहत्यांना भावूक करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Popular Villain Kamal Roy Passes Away at 54

Web Summary : Malayalam actor Kamal Roy, brother of actresses Urvashi and Kalpana, died at 54 due to cardiac arrest. Known for villainous roles in films like 'Kalyana Sougandhikam,' his death brings sorrow to the film industry. His last wish to do something for his mother remained unfulfilled.
टॅग्स :Tollywoodबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकारहृदयविकाराचा झटका