Join us

करण जोहरचं 'धर्मा प्रॉडक्शन' यशाच्या शिखरावर! अक्षय कुमारचा 'केसरी २' ठरला सर्वोत्तम चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:00 IST

अक्षय कुमार, आर. माधवनची भूमिका असलेला केसरी २ सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत असून प्रेक्षक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचं कौतुक करत आहेत (kesari 2)

बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमांची निर्मिती करण्यामागे धर्मा प्रॉडक्शनचा मोठा वाटा आहे. करण जोहर धर्मा प्रॉडक्शनचा सर्वेसर्वा आहे. उत्तमोत्तम सिनेमांची निर्मिती करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात धर्मा प्रॉडक्शन कायमच पुढाकार घेतं. अशातच धर्मा प्रॉडक्शन आणि करण जोहरने त्यांच्या सर्वोत्तम सिनेमांच्या यादीत आणखी एका सिनेमाची भर घातली आहे. हा सिनेमा म्हणजे 'केसरी २'. अक्षय कुमार आणि आर.माधवन यांची प्रमुख भूमिका असलेला  'केसरी २' सिनेमाची सध्या चांगली प्रशंसा होतेय.

'केसरी २' ठरला धर्मा प्रॉडक्शनचा सर्वोत्तम सिनेमा

अक्षय कुमारची प्रमुख भूमिकेत असलेला आणि  धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्मिती झालेला 'केसरी २' सिनेमा १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात जालियनवाला बाग हत्याकांडामागील न ऐकलेलं वास्तव मांडलं गेलंय. चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड निर्माण केले आहे. इतकंच नव्हे तर केसरी २ हा सिनेमा धर्मा प्रोडक्शनच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक ठरत आहे.  या चित्रपटामुळे धर्मा प्रोडक्शनसाठी २०२५ हे वर्ष यशस्वी ठरले आहे.

'केसरी २' मधून धर्मा प्रोडक्शनने पुन्हा एकदा आपली चतुरस्त्र निर्मितीक्षमता सिद्ध केली आहे. मनोरंजन आणि प्रेक्षकांना विचारप्रवृत्त करणारी आशयघन कलाकृती अशा दोन्ही गोष्टी 'केसरी २' च्या माध्यमातून धर्मा प्रॉडक्शनने जमवून आणल्या आहेत. 'केसरी २'सोबतच धर्मा प्रोडक्शनचा दुसरा चित्रपट 'होमबाउंड' सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे.

२०२५ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील प्रतिष्ठित Un Certain Regard विभागात त्याची निवड झाली आहे. नीरज घेवन दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अशाप्रकारे  'केसरी २' आणि होमबाउंड या दोन सिनेमातून धर्मा प्रॉडक्शन यशाच्या शिखरावर आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

टॅग्स :अक्षय कुमारकरण जोहरआर.माधवनबॉलिवूड