Vicky Kaushal : 'छावा' सिनेमा अखेर आज प्रदर्शित झाला आहे. विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. शंभूराजांच्या लूकमध्ये विकी अगदी शोभून दिसला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहून प्रेक्षक प्रभावित झाले होते. आता थिएटरमध्ये 'छावा' पाहिल्यानंतर प्रेक्षक भारावून गेले आहेत. विकी कौशलने घेतलेल्या कठोर मेहनतीचं फळ पडद्यावर पाहायला मिळतंय. विकीने केवळ छत्रपती संभाजी महाराजांची साकारलीच नाही तर ती जगताना दिसतोय. आताच्या पिढीतील सर्वोत्तम अभिनेता म्हणून त्याचा उल्लेख प्रेक्षक करत आहेत. विकीची पत्नी आणि लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif on Chhaava) हिनं पोस्ट शेअर करत नवरोबांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
'छावा' सिनेमाचा काल प्रीमियर शो पार पडला. या सोहळ्याला विकीनं पत्नी कतरिना कैफच्या साथीने उपस्थिती लावली होती. नवऱ्याचा 'छावा' सिनेमा पाहून कतरिनाने आज इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. "किती सुंदर सिनेमॅटिक अनुभव होता... छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा अतिशय जिवंतपणने मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी अतिशय उत्तम पद्धतीने कथा सादर केली आहे. सिनेमा पाहून थक्क झालेय... सिनेमाची शेवटची ४० मिनिटं… त्या क्षणाला आपण नि:शब्द होतो".
पुढे तिनं लिहलं, "मी काल रात्री हा सिनेमा मी पाहिला आणि आज सकाळी उठल्यापासून मला तो पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा होतेय. या चित्रपटाचा माझ्यावर जो प्रभाव पडलाय, तो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही आणि विकी कौशल… तू तर सर्वोत्कृष्ट आहेसच. प्रत्येक वेळी जेव्हा तू पडद्यावर येतोस, तुझा शॉट, तू पडद्यावर जिवंतपणा आणतोस. तू पात्रांमध्ये ज्या पद्धतीने सहज एकरूप होतोस, हे पाहून खूपच छान वाटतं. मला तुझा आणि तुझ्या प्रतिभेचा खूप अभिमान आहे. दिनेश विजन तुमच्याबद्दल तर काय बोलू... तुम्ही खरंच खूप दूरदर्शी आहात. तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता, त्याचं सोनं करता. सिनेमातल्या सगळ्याच कलाकारांनी अभूतपूर्व काम केलं आहे. हा सिनेमा रुपेरी पडद्यासाठीच बनवला गेलाय… संपूर्ण टीमचा मला खूप अभिमान आहे, #छावा", असं तिनं म्हटलं.