टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कपल अली गोनी (Ali Goni) आणि जॅस्मीन भसीन (Jasmin Bhasin) अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. बिग बॉस १४ मध्ये दोघांची ओळख झाली आणि त्यांचं रिलेशनशिप सुरु झालं. त्यांचे कपल गोल्स फोटो कायम लक्ष वेधून घेतात. काही वर्षांच्या डेटिंगनंतर आता नुकतेच दोघं लिव्ह इनमध्ये राहायला लागले आहेत. याची माहिती जॅस्मीनने तिच्या युट्यूब व्लॉगमधून दिली. अली आणि जॅस्मीनला अनेकदा धर्मावरुन ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता यावर जॅस्मीनने पहिल्यांदाच थेट उत्तर दिलं आहे.
जॅस्मीन भसीनने नुकतीच 'हिंदीरश' पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी धर्मावरुन ट्रोलिंग आणि अली गोनीसोबतच्या नात्यावर आई वडिलांची रिअॅक्शन यावर जॅस्मीन म्हणाली, "अली आणि माझ्या नात्यावर जेव्हा धर्मावरुन कमेंट्स येतात तेव्हा मला कधीकधी हसू येतं. काही जणांना हे खूप चुकीचं वाटतं. काही लोक खूप उलट सुलट आणि घाणेरड्या कमेंट्स करतात. तर दुसरीकडे असेही काही लोक आहे जे आमच्यावर खूप प्रेमही करतात. आम्हाला पाठिंबा देतात."
ती पुढे म्हणाली,"जोडीदाराकडून आपल्याला केवळ प्रेम, सम्मान आणि साथ हवी असते. माझ्यासाठी कुटुंब महत्वाचं आहे. माझं संगोपन तसंच झालं आहे. मी अलीला दूर करु शकत नाही आणि जर कोणत्या मापदंडामुळे माझ्या स्वप्नातल्या जोडीदाराला दूर करत असेल तर मी खरंच समंजस आहे की वेडी? रीतसर लग्न ठरवताना आईवडील कायम सांस्कृतिक आणि धार्मिक बाजू पाहतात. पण याचा अर्थ तुम्ही त्याच्यासोबत खूश राहालच असं नाही. शेवटी हे प्रत्येक व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून आहे."
"मी जर कोणा एका व्यक्तीला भेटले जो माझ्या सर्व मापदंडात योग्य बसतो तर मी त्याला का जाऊ देऊ? इतरांना काहीही बोलू देत, किती चुकीचं वाटू दे, माझं आयुष्य आहे मी माझ्या मताप्रमाणेच निर्णय घेईन." असंही ती म्हणाली.