Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनात सोबत करणं हे माझं कर्तव्य; जरांगेंचा फोटो शेअर करत अभिनेत्रीची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 15:04 IST

मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेने मराठा आरक्षणाला सोबत असल्याची पोस्ट लिहिली आहे.  

मुंबई - उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील नवी मुंबईतील वाशी येथे पोहोचले असून आपल्या उपोषणाला सुरुवात झाल्याचं त्यांनी म्हटल. जरांगे मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव घेऊन मुंबईच्या वेशीवर आले आहेत. त्यांच्या या आंदोलनास राज्यभरातील मराठा बांधवांकडून पाठिंबा मिळत असून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघार नाही, असे जरांगे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या स्वागताला गावागावात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. महिला भगिनीही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होताना दिसून येत आहे. आता, मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेने मराठा आरक्षणाला सोबत असल्याची पोस्ट लिहिली आहे.  

अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन जरांगे पाटील यांचा पुण्यातील व्हायरल फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत मत व्यक्त करताना आरक्षणाच्या आंदोलनात सोबत करणं हे माझं कर्तव्य आहे, असे म्हणत या आंदोलनास आपला पाठिंबा दर्शवला आहे. 

''साधं फिरायला जाऊन घरी परतलो, तरी पुढचे २ ते ३ दिवस “फार दमलो” म्हणत काढतो आपण. पण हा माणूस.. एक भाबडा म्हणावं की वेडा म्हणावं. आलेल्या हजारो संकटांना या माणसाने याच्या सहज बोलण्याने, खरेपणाने परतवून लावले. आज लाखो मुलांच्या डोळ्यांत एक स्वप्नं आहे की आता तरी न्याय मिळेल. हा विश्वास या माणसाने त्याच्या आरक्षणाप्रती असलेल्या सातत्याने, समाजाप्रती असलेल्या प्रेमाने निर्माण केला, टिकवला, वाढवला. म्हणूनच आज समाजाचा एक भाग म्हणून या आंदोलनात सोबत करणे हे माझे कर्तव्य वाटते, असे अश्विनीनेम म्हटलं आहे. हा फोटो माणूस म्हणून बघाल तर जीवाची घालमेल होईल, असेही तिने म्हटले. याशिवाय टीप म्हणून तिने तिच्या चाहत्यांसाठीही संदेश दिला आहे, 

''माझे कलाकार म्हणून काम पाहणारे आणि माझ्यावर प्रेम करणारे हे एका समाजाचे नाहीत तर ते १२ बलुतेदार, १८ पगड जातीचे आहेत. आज मी मराठा आंदोलनात सहभाग दर्शवणे म्हणजे त्या सगळ्या लोकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय व्हावा असे अजिबात नाही, समाजातील सर्वच घटकांना समान न्याय मिळावा हेच माझे मत,'' असे अश्विनीने म्हटले आहे. 

अभिनेत्री अश्विनी महांगडे ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. सध्या अश्विनी आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारताना दिसते आहे. तिला या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळताना दिसते आहे. या मालिकेपूर्वी ती स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत पाहायला मिळाली होती. सुरुवातीला तिला या मालिकेसाठी रिजेक्ट केले होते. मात्र त्यानंतर तिची  राणूअक्काच्या भूमिकेसाठी निवड झाली. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने राणूबाई शिवाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली होती. 

जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं

मराठा आंदोलनाबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. शासकीय नियमांनुसार त्यावर अंमलबजावणी होईल. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र दिले. आता आणखी देऊन ही संख्या ५० लाखांच्या वर जाणार आहे," असा दावा दीपक केसरकरांनी केला आहे. मुंबई ठप्प होणं हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत यंत्रणा कामाला लावली आहे. शेवटी प्रथा परंपरेचा मान ठेवणे ही सुद्धा राज्याची संस्कृती राहिली आहे. किती अधिकारी भेटायला गेले, किती नेते भेटायला गेले आणि आता सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मनोज जरांगेनी मान ठेवला पाहिजे, त्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेटून आनंद नक्कीच साजरा करतील," अशी भूमिका केसरकर यांनी घेतली आहे. 

टॅग्स :मराठा आरक्षणमराठाआरक्षणमनोज जरांगे-पाटीलअश्विनी महांगडे