प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गायक आणि 'छम्मक छल्लो' फेम एकॉनची (Akon) जगभरात क्रेझ आहे. आता एकॉनबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लग्नाच्या २८ वर्षांनंतर एकॉनची पत्नी टोमेका थियामने (Tomeka Thiam) त्याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे एकॉन आणि त्याची पत्नी टोमेका थियाम यांचा २८ वर्षांचा संसार संपुष्टात येणार असून दोघं एकमेकांपासून वेगळे होणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार एकॉन आणि टोमेका यांनी १९९६ मध्ये एकमेकांशी लग्न केले. या दोघांना १७ वर्षांची जर्नी नावाची एक मुलगी आहे. आता लग्नाच्या २८ वर्षांनंतर एकॉन आणि त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याशिवाय मुलीचं पालकत्व मिळण्यासाठी दोघांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. वैवाहिक जीवनातील मतभेद आणि वैयक्तिक कारणांमुळे या दोघांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. एकॉनचे मूळ नाव आलियाउने डॅमाला बाडारा अकारा न्डेये (Aliaune Damala Badara Akon Thiam) आहे. एकॉनने टोमेकासोबत नातं अनेक वर्ष खाजगी ठेवलं होतं.
एकॉनने त्याच्या कुटुंबाला नेहमीच मीडियापासून दूर ठेवले. याशिवाय पोलीगॅमी अर्थात एकापेक्षा जास्त लग्न या संकल्पनेवर त्याचा विश्वास आहे. मात्र, आता घटस्फोटाच्या बातमीने त्याचं खाजगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एकॉनने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत. शाहरुख खानच्या 'रा.वन' सिनेमातील 'छम्मक छल्लो' आणि 'क्रिमिनल' ही त्याची गाणी भारतात खूप लोकप्रिय झाली. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत काम केलं आहे. घटस्फोटाच्या या बातमीने एकॉनच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या प्रकरणावर एकॉन किंवा त्याच्या पत्नीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.