Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gautami Patil : "आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत"; गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:36 IST

Gautami Patil And Prajakta Mali : गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने भाजपा आमदार सुरेश धस यांच्या विधानानंतर पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. "सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी. मी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करावी. मीदेखील कायदेशीर कारवाई करत राहीन. सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेल्या टिप्पणीचा मी निषेध करते" असं म्हटलं होतं. या संपूर्ण प्रकरणावर आता गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे.

"आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत आहेत, प्राजक्ता ताई, ट्रोलिंगकडे लक्ष देऊ नकोस" असं म्हणत गौतमीने प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. तसेच प्लीज कोणाबरोबरही कोणाचं नाव जोडू नका. कलाकाराला पाठिंबा द्या असंही म्हटलं. "प्राजक्ता ताई, आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत आहोत. या गोष्टीवरून ट्रोल जरी केलं तरी लक्ष देऊ नकोस. तू पत्रकार परिषदेत जे काही बोलली ते मी मगाशी ऐकलं. तू जे काही बोलली ते सगळं बरोबर होतं."

"कलाकाराचं दुःख हे कलाकाराचं माहीत असतं"

"मी एक कलाकार आहे. माझी एक विनंती आहे, कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या. त्याला कुठल्याही नेत्याबरोबरच नाही, तर कोणाहीबरोबर त्या कलाकाराचं नाव जोडू नका. कलाकाराचं दुःख हे कलाकाराचं माहीत असतं. आज कोणाला काय त्रास होतोय हे तुम्हाला माहीत नाही. आज त्या व्यक्तीलाच माहीत आहे. मला खूप ट्रोल केलं गेलं. बऱ्याच गोष्टींना मी ट्रोल झाली. पण माझा त्रास मलाच माहीत, लोकांना माहीत नाही." 

"आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत"

"लोक आपापल्या घरात राहतात, ट्रोल करतात. जे चुकीच आहे. म्हणून प्लीज कोणाबरोबरही कोणाचं नाव जोडू नका. कलाकाराला पाठिंबा द्या. त्याच्यासोबत उभे राहा. जसं प्रेक्षक वर्ग आम्हा कलाकारांवर प्रेम करतात, तसंच प्राजक्ता ताईवर बरेच प्रेक्षक प्रेम करतात, म्हणून या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. अशीच तू पुढे जा, हसत राहा आणि खूप छान राहा" असं प्रसार माध्यमांशी संवाद साधताना गौतमी पाटीलने म्हटलं आहे. 

मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे - सुरेश धस

प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे" असं म्हटलं आहे. तसेच निषेध म्हणून मी महाराष्ट्राची हास्यजत्रा बघायचं बंद करतो असंही म्हटलं. "मी माफी मागणार नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून, पाया पडून एक विनंती आहे की, या खून प्रकरणावरचं लक्ष तुम्ही कोणत्याही हिरो-हिरोईनकडे ढकलू नका. तुम्हाला माझी विनंती आहे. माझी आणि त्यांची नीट ओळखही नाही."  

टॅग्स :गौतमी पाटीलप्राजक्ता माळीसुरेश धसधनंजय मुंडेबीड