Join us

सनी देओलसमोर खलनायक साकारणार 'हा' दिग्गज अभिनेता; अनिल शर्मांचा 'गदर ३' लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 12:45 IST

'गदर ३'मध्ये तारा सिंहच्या भूमिकेत सनी देओल झळकणार आहे.

२०२३ मध्ये आलेल्या 'गदर २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षितरित्या चांगलंच यश मिळवलं. समोर अक्षय कुमारचा बहुचर्चित OMG 2 हा सिनेमा असूनही 'गदर २'ला प्रेक्षकांनी चांगलंच प्रेम दिलं. 'गदर २'मुळे सनी देओलने अभिनेता म्हणून पुन्हा एकदा सुपरहिट कमबॅक केलं. आता सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे 'गदर ३'. अनिल शर्मा आता सनी देओलसोबत 'गदर'च्या तिसऱ्या भागाची जय्यत तयारी करत असल्याचे मीडिया रिपोर्ट समोर आलेत. 'गदर ३'मध्ये यावेळी सनी देओलसोबत दिग्गज अभिनेता झळकणार आहे. जाणून घ्या.

गदर ३ मध्ये झळकणार हा अभिनेता

'गदर ३' सिनेमाच्या कथेवर दिग्दर्शक अनिल शर्मा काम करत आहेत. सनी देओल 'गदर ३'मध्ये पुन्हा एकदा तारा सिंहच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात सनी देओलसोबत एक दिग्गज अभिनेता खलनायक म्हणून झळकणार आहे. हा अभिनेता म्हणजे नाना पाटेकर. नाना आणि सनी देओल 'गदर ३'च्या निमित्ताने अनेक वर्षांनी एकत्र काम करणार आहेत.

काहीच दिवसांपूर्वी अनिल शर्मांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'वनवास' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला नाना आणि सनी एकत्र आले होते. त्यामुळे आता 'गदर ३'मध्येही नाना-सनी व्हिलन-हिरो म्हणून एकत्र झळकणार असल्याची शक्यता आहे. अर्थात याबाबत अधिकृत घोषणा झाली नसून अजूनतरी सर्व बोलणी प्राथमिक स्तरावरच आहेत. 'गदर ३' सिनेमा २०२६ ला रिलीज होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या भागाच्या सुपरहिट यशानंतर 'गदर ३'ची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

टॅग्स :सनी देओलनाना पाटेकरबॉलिवूड