Join us

'छावा' सुरु असतानाच पडद्यावर लागली आग, प्रेक्षकांची पळापळ; म्हणाले, 'आम्हाला वाटलं सिनेमातलं दृश्य...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:02 IST

फायर अलार्म वाजताच झाली पळापळ

विकी कौशलचा 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी रोजी जगभरात रिलीज झाला. पहिल्या दिवसापासूनच सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आपल्या राजाला विकीच्या रुपात पडद्यावर बघण्यासाठी चाहते गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकीने पडद्यावर जिवंत केली आहे. दरम्यान देशातील एका थिएटरमध्ये 'छावा' चित्रपट सुरु असतानाच चक्क स्क्रीनलाच आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे लोक चांगले घाबरले आणि पळत सुटले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ही घटना आहे दिल्लीतील सिटीवॉक मॉलमधील पीव्हीआर थिएटरमध्ये घडली आहे. 'छावा' सिनेमा सुरु असताना क्लायमॅक्सवेळीच अचानक पडद्यावर आग लागली. संध्याकाळी ४.१५ च्या सुमारास ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, 'सिनेमा सुरु असतानाच समोर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात अचानक आग भडकली. यामुळे सगळेच घाबरले आणि एक्झिटकडे धावत सुटले'. तर आणखी एका प्रेक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, हॉलमध्ये फायर अलार्म वाजला. आग लागताच सिनेमा हॉलमधून सर्वांना बाहेर काढण्यात आलं. सगळे एक्झिटच्या दरवाजाकडे धावले'. आणखी एकाने सांगितलं की, 'आम्हाला आधी सिनेमातलंच दृश्य आहे असं वाटलं. मात्र नंतर कळलं की थिएटरमध्येच आग लागली आहे आणि आम्ही पळालो.'

तर ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. संध्याकाळी ५.४२ वाजता अग्निशमन दलाला घटनेची सूचना करण्यात आली. अग्रिशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान ही आग किरकोळ होती आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ६ वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. 

टॅग्स :दिल्ली'छावा' चित्रपटआगनाटकअग्निशमन दल