Join us
Daily Top 2Weekly Top 5

"व्हिडीओ व्हायरल झाली अन् वाटलं आता सगळं संपलं पण...", गौतमी पाटीलला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 17:48 IST

नृत्यांगना गौतमी पाटील आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.

मुंबई : आपल्या अदाकारीने तरूणाईच्या मनावर राज्य करणारी नृत्यांगना गौतमी पाटील आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. महाराष्ट्रातील खेड्या पाड्यात गौतमी पोहचली आहे. वाद, नाट्यमय घडामोडी, विरोध, राजकारण्यांची टोलेबाजी, तरूणाईचा ताल यांमुळे गौतमीला सातत्याने प्रसिद्धी मिळत गेली. नेहमी आपल्या अदांनी तरूणाईला आपल्या तालावर नाचवणारी गौतमी आज मात्र अक्षरक्ष: रडली. होय, आपल्या मनातील बाबी उघडपणे सांगताना गौतमीला अश्रू अनावर झाले. आपल्याला कोणाचा पाठिंबा नसताना देखील इथपर्यंत पोहचले अन् सर्वकाही व्यवस्थित करत असताना देखील माझ्यावरच का टीका केली जाते असा प्रश्नही तिने उपस्थित केला. 

अलीकडेच गौतमीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाण्यावर ठेका धरला होता. यावरून तिला अनेकांनी विरोध केला. पण, अखेर आता खुद्द गौतमीने याप्रकरणी मौन सोडले आहे. "ते राष्ट्रवादी पक्षाचं गाणं होतं हे माहित होतं... पण अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं. कारण साहजिकच  ज्यांनी आम्हाला पैसे दिलेत ते सांगतील त्या गाण्यावर आम्हाला डान्स करायला हवा. ते पक्षाचे चाहते असावेत", असं गौतमीनं सांगितलं. मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाच्या 'माझा कट्ट्या'वर आलेली अव्यक्त गौतमी व्यक्त झाली.

टीकाकारांसमोर मीच का? - गौतमीइतर क्षेत्रात देखील कलाकार बोल्डनेसने चाहत्यांचं लक्ष वेधत असतात. चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी चित्रपटात  रोमँटिक सीन दाखवले जातात. याचाच दाखला देत गौतमीने सांगितले की, मी विचार केला की नेहमी मलाच का ट्रोल केलं जातं, टीकाकारांना मीच दिसते का? बरेच कलाकार आहेत जे बोल्डनेस दाखवत असतात. पण त्यांना विरोध न करता केवळ मलाच लक्ष्य केलं जातं. 

तसेच कठीण काळाचे वर्णन करताना गौतमी पाटीलला अश्रू अनावर झाले. ती म्हणाली की, कधी-कधी मी खूप खचते. एवढ्या टीका झाल्यात की न बोललेलं बरं... मी खूप सामोरे गेली आहे. मी त्यांच्या घरातली आहे म्हणून असा विषय आहे का? असंही वाटतं. माझ्याबद्दलच का आक्षेप घेतला जातो. मी व्यवस्थित करूनही मला का असं ट्रोल केलं जातंय. हा प्रश्न पडतो. मला कोणाचा पाठिंबा नाही, माझ्या पाठीशी कोणाचा हात नसताना देखील या गोष्टींना सामोरे जावं लागतंय.

व्हायरल व्हिडीओवर गौतमीने म्हटले... खरं तर गौतमी पाटीलचा कार्यक्रमादरम्यान कपडे बदलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपींवर कारवाई केली. पण, व्हिडीओची ती झळ आजही गौतमीच्या मनात कायम आहे. "व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा खूप वाईट वाटलं... आता थांबावं असं मन सांगत होतं. माझ्या मैत्रींणीपर्यंत तो व्हिडीओ पोहचला होता. पण त्यांनी मला सांगायचं धाडस केलं नाही. तेव्हा मी खचले होते पण मी थांबले नाही, पण खूप घाबरले होते. लोक या थराला जातात याची कल्पना देखील नव्हती", असं तिनं नमूद केलं.

चाहत्यांचे मानले आभार गौतमी पाटीलवर सातत्याने टीका होत असली तरी तिचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे हे विसरून चालणार नाही. सातत्याने गौतमीला पाठिंबा देणाऱ्या तिच्या चाहत्यांना तिनं सॅल्युट ठोकला. "सगळेच सारखे आहेत असं मी म्हणणार नाही. कारण माझा चाहतावर्ग देखील खूप आहे, त्यांना मी खरंच सॅल्युट करते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कधीच वाटलं नाही की, मला एवढा प्रतिसाद मिळेल पण त्यांनी मला साथ दिली. महिलांनी देखील खूप पाठिंबा दिला त्यामुळेच मी आज इथे पोहचली आहे", अशा शब्दांत गौतमीने चाहत्यांचे आभार मानले.  

टॅग्स :गौतमी पाटीलमहाराष्ट्र