Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनम कपूरच्या सिनेमातून विवेक दहियाला दाखवला होता बाहेरचा रस्ता; खुलासा करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 11:05 IST

Vivek dahiya: विवेकने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ऑडिशनचा किस्सा सांगितला.

कलाविश्वात आज असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी स्वबळावर इंडस्ट्रीत त्यांचं स्थान निर्माण केलं आहे. इतकंच नाही तर यातील अनेकांनी बॉलिवूडमध्येही नशीब आजमावलं आहे. मात्र, यात एक अभिनेता असा होता ज्याचा हा प्रवास सोपा नव्हता. एका बड्या सिनेमासाठी त्याची निवड झाली होती. मात्र, ऐनवेळी त्याला या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. नुकतीच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने याविषयीचा किस्सा सांगितला.

अभिनेत्री सोनम कपूरच्या (sonam kapoor) 'खुबसूरत' या सिनेमासाठी विवेकची निवड झाली होती. या सिनेमासाठी त्याने ऑडिशनही दिलं होतं. मात्र, ऐनवेळी त्याच्या जागी एका पाकिस्तानी अभिनेत्याला रिप्लेस करण्यात आलं.

"मी २०१४ मध्ये सोनम कपूर आणि फवाद खान यांच्या खुबसूरत सिनेमासाठी ऑडिशन दिलं होतं. माझा अभिनयदेखील त्यांना आवडला होता. आम्हाला तुमचा अभिनय आवडलाय. पण, कॅमेरासमोर तुम्ही कसे दिसता हे आम्हाला पाहायचंय त्यामुळे एक सिंपल रिडींग करुयात, असं त्यांनी मला सांगितलं. मी या सगळ्यासाठी तयारही झालो", असं विवेक म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मला हे जमत नाहीये हे त्या लोकांना कळलं होतं. मला घाम येत होता, मी थरथर कापत होतो. मी भूमिका साकारण्यापूर्वी खूप घाबरत होतो. माझी परिस्थिती सोनमला कळली आणि घरी जाऊन तू स्क्रिप्टवर काम कर असं तिने मला सांगितलं. मी नंतर नीट तयारी करुन आलो पण तरी सुद्धा सोनम कपूरसोबत पडद्यावर काम करु शकेन असं त्यांना वाटत नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी माझ्या जागी पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची निवड केली."

दरम्यान, विवेक छोट्या पडद्यावर बऱ्यापैकी सक्रीय आहे. तो 'झलक दिखला जा 11' मध्ये अखेरचा झळकला होता. विवेकने अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीसोबत लग्नगाठ बांधली आहे.

टॅग्स :बॉलिवूडदिव्यांका त्रिपाठीसोनम कपूरविवेक दहियासिनेमा