गेल्या काही महिन्यांपासून मनोरंजन विश्वात एका प्रकरणाने चांगलीच खळबळ माजली होती. ती म्हणजे नयनतारा (nayanthara) आणि धनुष यांच्यामध्ये झालेल्या वादाची. धनुषनेनयनतारावर कॉपीराइट अॅक्टच्या अंतर्गत कोर्टात याचिका दाखल करुन नुकसानभरपाईची मागणी केली होती. पुढे धनुषने (dhanush) केलेली याचिका रद्द करण्यात यावी म्हणून नेटफ्लिक्स इंडियाने नयनताराच्या डॉक्यूमेंट्रीच्या बाजूने वेगळी याचिका दाखल केली होती. परंतु नुकत्याच आलेल्या बातमीनुसार कोर्टाने नेटफ्लिक्सची याचिका फेटाळली असून धनुष ही केस जिंकला आहे.
काय आहे प्रकरण?
साऊथ कलाकार नयनतारा आणि अभिनेता धनुष यांच्यातील वाद हा एका क्लिपवरुन झाला होता. जेव्हा नयनताराने तिच्या ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल’ या डॉक्युमेंट्रीमध्ये धनुषच्या निर्मितीखाली झालेल्या ‘नानुम राउडी धान’ या सिनेमातील ३ सेकंदाचा व्हिडिओ वापरला. यावरुन धनुषने तिला कायदेशीर नोटीस पाठवली. जर २४ तासांच्या आत क्लीप हटवली नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असं धनुषच्या कंपनीने नोटीशीत म्हटलं होतं. अखेर हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं.
नेटफ्लिक्सला द्यावी लागणार इतकी भरपाई?
यामुळे आता धनुष ही केस जिंकल्याने नेटफ्लिक्स इंडियाला तब्बल १० कोटींची भरपाई द्यावी लागणार आहे. धनुषच्या परवानगीशिवाय नयनतारा आणि नेटफ्लिक्सने धनुषच्या सिनेमातील ३ सेकंदाची ही क्लिप वापरली होती. धनुषने इशारा देऊनही त्याकडे कानाडोळा करुन नेटफ्लिक्स आणि नयनताराने डॉक्यूमेंट्रीमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे कोर्टात धनुषचा विजय झाला असून नयनतारा आणि नेटफ्लिक्सला मोठी भरपाई द्यावी लागणार आहे. ABP च्या वृत्तानुसार याप्रकरणी पुढील सुनवाई ५ फेब्रुवारीला होणार आहे.