Renuka Shahane: अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) हे मनोरंजनविश्वातील नावाजलेलं नाव आहे. सुरभी सर्कस या लोकप्रिय मालिका तसंच हम आपके है कौन या चित्रपटामुळे त्या घराघरात पोहोचल्या. हम आपके है कौन चित्रपटामुळे त्यांना नवी ओळख मिळाली. सध्या त्या देवमाणूस या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना रेणूका शहाणे यांनी अभिनेते आशुतोष राणा यांच्यासोबत लग्न केलं. या दाम्पत्याला दोन मुलं देखील आहेत. परंतु लग्नानंतर रेणूका शहाणे इंडस्ट्रीतून गायब झाल्या. अगदी काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी अभिनयाला रामराम केला. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासावर भाष्य केलं आहे.
नुकतीच रेणूका शहाणे यांनी 'लोकशाही फ्रेंडली'ला मुलाखती दिली. बकेटलिस्टनंतर आता देवमाणूस मध्ये दिसताय, सिलेक्टेड मराठी सिनेमामध्ये काम करताय का असं प्रश्न विचारण्यात आला. या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, "मला अशा काही ऑफर्स आल्या नाहीत, जेणेकरून मी त्या अगदी आवर्जून कराव्या. तसं पाहिलं तर हिंदी चित्रपट पण मी मोजकेच केलेत. फक्त ज्या एक चित्रपटात मी होते तो इतका गाजला की मला त्यामुळे आयुष्यात दुसरं काही केलं नाही तरी ते पुरुन उरण्यासारखं आहे. पण, बऱ्याचशा घराच्या जबाबदाऱ्या होत्या. मी मुलांचं बालपण त्यांचं कॉलेज या सगळ्या गोष्टी मी एन्जॉय केल्या. आता मुलं मोठी झाली आहेत त्यामुळे मी बाहेर गावचं मी काम घेऊ शकते."
यानंतर पुढे त्या म्हणाल्या, "आता काय झालंय की चित्रपटाचं मुंबईत शूटिंग कमी होतं. त्यामुळे मी चित्रपटांच्या ऑफर्स आधीही स्विकारु शकत नव्हते. ही माझी अडचण होती. पण, आता मला ज्या ऑफर्स येत आहेत त्या खूपच चांगल्या आहेत. त्यामुळे मी अजून काम करु इच्छिते." असा खुलासा रेणूका शहाणे यांनी केला.
‘लव फिल्म्स’चे सादरीकरण असलेल्या ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग आहेत. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होईल.