Deepika -Ranveer Quadruplex Apartment: बॉलिवूडमधील क्युट कपल म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजेच रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone). त्यांच्या अफेरपासूनच हे कपल फार चर्चेत होतं. काही महिन्यांपूर्वी ते आई बाबा झाले आहेत. त्यातच आता त्यांच्या नव्या घराची चर्चा सुरु आहे. रणवीर आणि दीपिकाचं नवं घर जवळपास बांधून तयार झालं आहे. लवकरचं हे जोडपं आपल्या लाडक्या लेकीसह या घरात प्रवेश करणार आहे. नुकतीच दीपिका-रणवीरच्या नव्या घराची पहिली झलक पाहायला मिळाली आहे.
मुंबईच्या वांद्रेतील बँडस्टँड येथे दीपिका आणि रणवीरचं घर आहे. नव्या घरात दोघं लेक दुआसह राहायला जाणार आहेत. माहितीनुसार, बँडस्टँडच्या सागर रेशम इमारतीमधील दीपिका-रणवीरचं हे नवं घर क्वाड्रप्लेक्स आहे. ते १६ मजल्यापासून ते १९ मजल्यापर्यंत आहे. हे घर समुद्राच्या अगदी जवळ असून त्यातून अरबी समुद्राचे मनमोहक दृश्ये पाहायला मिळतं. या घरात अंदाजे ११,२६६ चौरस फूट अंतर्गत जागा आहे आणि १,३०० चौरस फूटांचं टेरेस आहे.अद्यावत सोयी-सुविधांनी युक्त अशा या घरासाठी दीपिका आणि रणवीरनं तब्बल १०० कोटी रुपये खर्च केले आहेत.
दीपिका आणि रणवीर हे शाहरुख खान आणि सलमान खानचे शेजारी होणार आहेत. कारण शाहरुखचा मन्नत बंगला आणि सलमानचं गॅलेक्सी अपार्टमेंट एकाच परिसरात आहे. हा असा परिसर आहे जिथे मुंबईतील उच्चभ्रू लोक राहतात. पण, मन्नत बंगल्याचं बांधकाम सुरू असल्याने शाहरुख कुटुंबासह तात्पुरता मुंबईतील पाली हिल परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेला आहे.
मुंबईतील या सुंदर घराव्यतिरिक्त या जोडप्याचा अलिबागमध्ये २२ कोटी रुपयांचा बंगला देखील आहे. दीपिका आणि रणवीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते दोघे अलिकडेच 'सिंघम अगेन' मध्ये दिसले होते. आई झाल्यानंतर दीपिकाने तिच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. तर रणवीर सिंग 'धुरंधर' आणि 'डॉन ३' मध्ये दिसणार आहे.