Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone),अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) आणि इरफान खान यांची मुख्य भूमिका असलेला 'पिकू' हा सिनेमा चांगलाच गाजला. शूजित सरकार दिग्दर्शित या सिनेमाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. २०१५ मध्ये 'पिकू' हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली. आता या चित्रपटाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. जवळपास १० वर्षानंतर पीकू चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने सोशल मीडियावर याबद्दल खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. हे जुने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक देखील थिएटरमध्ये तुफान गर्दी करताना दिसत आहेत. अलिकडेच सिनेमागृहांमध्ये 'सनम तेरी कसम', 'रहना है तेरे दिल में' तसेच 'तुझे मेरी कसम' यांसारखे गाजलेले सिनेमे रि-रिलीज करण्यात आले. पु्न: प्रदर्शित केल्यानंतर या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. त्यात आता अभिनेत्री दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन यांचा 'पिकू' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.
दीपिका पादुकोणने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिलंय की, "पिकू माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे. हा चित्रपट १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ९ मे २०२५ रोजी पुन्हा एकदा थिएटरमध्ये येत आहे. इरफान आम्हाला तुझी वारंवार आठवण येते...", अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी पोस्ट करत सिनेमा पाहण्यासाठी आतुर असल्याचं म्हटलं आहे.