बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा यूट्यूब व्लॉग्समुळे अधिक चर्चेत आहे. फराहच्या या व्लॉग्समध्ये तिचा कूक दिलीप हा आता एक सेलिब्रिटी बनला असून प्रेक्षकांचा तो लाडका झाला आहे. मात्र, फराहने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये दिलीपबद्दल एक असा खुलासा केला आहे, ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. फराहच्या मते, तिचा कूक दिलीप हा तिच्या नकळत तिची महागडी BMW कार फिरवण्यासाठी वापरतो.
फराह नुकतीच प्रणित मोरेच्या घरी गेली होती. तेव्हा या मजेशीर प्रसंगामध्ये फराहने दिलीपला थेट विचारले की, तू आणि ड्रायव्हर उबेद माझी कार घेऊन लोणावळ्याला फिरण्यासाठी गेला होता का? यावर दिलीपची बोलती बंद झाली आणि तो फक्त मिश्किलपणे हसू लागला. फराह गमतीने म्हणाली की, मी माझ्या घरात एक असा 'राक्षस' तयार केला आहे, जो आता माझ्याच आलिशान कारमधून फिरतोय. दिलीपच्या या सेलिब्रिटी थाटाची चर्चा आता सोशल मीडियावर सर्वत्र होत आहे.
प्रामाणिकपणा आणि मेहनत
दिलीप हा केवळ फराहचा कर्मचारी नसून त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आज दिलीप दरमहा एक लाखापेक्षा जास्त पगार घेतो. इतकेच नाही तर त्याने बिहारमधील आपल्या गावी चक्क तीन मजली आणि सहा बेडरूमचा बंगला बांधला असून त्यात वैयक्तिक स्विमिंग पूलची सोयही केली, अशीही चर्चा आहे. दिलीपची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, त्याला नुकतीच एक लाख रुपयांची अभिनयाची ऑफर आली होती, परंतु त्याने ती नाकारली.
दिलीपला आता बीएमडब्ल्यू पेक्षाही महागडी कार खरेदी करण्याची इच्छा आहे. नुकतेच दिलीपने शाहरुख खानसोबत एका जाहिरातीचे चित्रीकरणही पूर्ण केले आहे. शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव त्याला खूप आवडला असून भविष्यातही त्याला किंग खानसोबत काम करण्याची इच्छा आहे. फराह खानने एका कूकला दिलेली ही वागणूक आणि दिलीपचे यश हे सध्या इंटरनेटवर कौतुकाचा विषय ठरत आहे.