Chhava Tax Free: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील ठळक घटनांवर आधारित छावा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच छावा बक्कळ कमाई करत आहे. दरम्यान, हा चित्रपट मध्य प्रदेशात टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एका कार्यक्रमात याची घोषणा केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनीही त्यांच्या जीवनात प्रचंड यातना भोगल्या. देशासाठी आणि धर्मासाठी आपले प्राण दिले. त्यांच्यावर छावा चित्रपट तयार करण्यात आला आहे. जर इतका चांगला चित्रपट बनला असेल, तर त्यावर कर का घ्यायला पाहिजे. त्यामुळे छावा चित्रपट मध्य प्रदेशात करमुक्त करण्याची मी घोषणा करतो. जो कोणी छावा चित्रपट बघेल, त्याला संभाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध घटना कळतील", असे मुख्यमंत्री यादव ही घोषणा करताना म्हणाले.
बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची डरकाळी
अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या छावा चित्रपट प्रेक्षकांच्या प्रतिसादाबरोबरच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
या चित्रपटाचे बजेट १३० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. पण, छावाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून, चित्रपटाच्या बजेटलाही मागे टाकले आहे.
छावा चित्रपट २०० कोटींच्या घरात पोहचण्यापासून काही पावले दूर आहे. सहाव्या दिवशी छावा चित्रपटाने ३२ कोटी कमावले असून, पहिल्या सहा दिवसांत छावाने १९७.७५ कोटी रुपये इतका गल्ला जमवला आहे. छावा चित्रपटाने जगभरात २५० कोटी कमाई केली आहे.
पहिल्या दिवशी छावाने ३१ कोटी रुपये कमावले होते. दुसऱ्या दिवशी ३७ कोटी, तिसऱ्या दिवशी ४८.५ कोटी, चौथ्या दिवशी २४ कोटी, तर पाचव्या दिवशी २५.२५ कोटी रुपये छावाने कमावले आहेत.