अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन जवळजवळ दोन महिने झाले आहेत, परंतु या चित्रपटाला टक्कर देणारा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. आधी 'सिकंदर' (Sikandar Movie) आणि नंतर काही दिवसांनी 'जाट' (Jaat Movie) रिलीज झाला, पण हे दोन्ही चित्रपट 'छावा'ला बॉक्स ऑफिसवरून हटवू शकले नाहीत. 'जाट'च्या रिलीजनंतर 'सिकंदर'च्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली आहे. चार मोठ्या चित्रपटांच्या लढाईत, छावाने अगदी कासवाच्या वेगानेही विजय मिळवला आहे कारण ५७ दिवसांनंतर, हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आणखी एक नवा विक्रम रचणार आहे.
सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 'छावा' चित्रपटाच्या कलेक्शनला मोठा फटका बसेल असे वाटत होते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसला अलविदा करेल असा अंदाजही वर्तवला जात होता. मात्र तसे झाले नाही आणि छावा अजूनही दररोज लाखो रुपयांची कमाई करत आहे. शुक्रवारी जाट आणि सिकंदरच्या कमाईत घट झाली असली तरी छावाने आपली पकड कायम ठेवली. Sakanlik.comच्या रिपोर्ट्सनुसार, 'छावा'ने रिलीजच्या ५७ व्या दिवशी हिंदी भाषेत बॉक्स ऑफिसवर एका दिवसात सुमारे २३ लाख रुपये कमावले आहेत, तर 'सिकंदर'ने १३ व्या दिवशी सुमारे ३० लाख रुपये कमावले आहेत. छावा चित्रपटाचे कलेक्शन देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर जवळपास ६०४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
'छावा' बॉक्स ऑफिसवर करणार आणखी एक विक्रम?छावा सिनेमाने आतापर्यंत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे, तर दुसरीकडे तो बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपटसृष्टीतील ७ वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. याशिवाय, लाइफटाईम कलेक्शनच्या बाबतीत, छावाने सनी देओलचा गदर २, सलमान खानचा सुलतान, श्रद्धा कपूरचा 'स्त्री-२' यासह अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. यानंतरही, विकी कौशलचा चित्रपट 'छावा' थांबला नाही, कारण आता हा चित्रपट आणखी एका मोठ्या विक्रमाकडे वाटचाल करत आहे. या चित्रपटाने ५७ दिवसांत हिंदीमध्ये एकूण ५८४ कोटी रुपये कमावले आहेत. हिंदी भाषेतील ६०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी छावाला फक्त १६ कोटी रुपये जास्त कमवावे लागतील. जगभरात 'छावा'ची कमाई ८०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.