निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी नुकतंच साऊथ इंडियन सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला (Junior NTR) नवा चेहरा असे संबोधले. यामुळे साऊथ दिग्दर्शक आणि अभिनेत्याने बोनी कपूर यांना चांगलंच सुनावलं आहे. ज्युनिअर एनटीआर कोणी नवा चेहरा नसून तो सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहे. गलाटा इंडियाच्या राऊंडटेबलवर या सर्व फिल्ममेकर-कलाकारांनी हजेरी लावली होती. तेव्हा बोनी कपूर यांच्या वक्तव्यावर अशाप्रकारे दाक्षिणात्य स्टार्सकडून पलटवार केला गेला.
निर्माते बोनी कपूर, दाक्षिणात्य निर्माते नागा वामसी आणि दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) या राऊंडटेबलचा भाग होते. बोनी कपूर आणि नागा वामसी सिद्धार्थसोबत साऊथ आणि बॉलिवूड सिनेमाबद्दल बोलत होते. ते म्हणाले, "त्याकाळी हिंदी भाषिक प्रेक्षकांनी कमल हसन यांचं स्वागत केलं. त्यामुळे दाक्षिणात्य निर्मात्याचा आणि दिग्दर्शकाचा सिनेमाही सुपरहिट झाला." यावर सिद्धार्थने बोनी कपूर यांना विचारलं, 'बॉलिवूडमध्ये आजही असं कोलॅबोरेशन होऊ शकतं का?' यावर बोनी लगेच म्हणाले, 'आदित्य चोप्रा करु शकतो. त्याने त्याच्या सिनेमात तारक(ज्युनिअर एनटीआर)ला का घेतलं आहे?'
यावर नागा वामसी आणि सिद्धार्थ दोघांनी ज्यु. एनटीआरच्या स्टारडमबद्दल सांगितले. "ज्युनिअर एनटीआर सिनेमात कोणी नवा चेहरा नाही आहे. तुम्ही इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एकाबद्दल बोलत आहात. जो भारतातील सर्वात मोठ्या निर्मात्यांपैकी एकासोबत काम करत आहे."
ज्युनिअर एनटीआर आदित्य चोप्राच्या 'वॉर २' मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो हृतिक रोशनसोबत झळकणार आहे. या सिनेमातून ज्युनिअर एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सध्या सिनेमाचं शूट सुरु आहे.